शाळांच्या आवारात बहरणार 'ताम्हण'; नगरमधून सुरू झाला 'राज्यफुल आपल्या दारी' उपक्रम


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
निळसर-गुलाबी रंगाच्या मनमोहक फुलाने मन मोहून टाकणारा ताम्हण वृक्ष आता शाळांच्या आवारात फुलणार आहे. ताम्हण वृक्षाचे फुल राज्य फुल असून, हे फुल प्रत्येक शालेय विद्यार्थ्यापर्यंत नेण्याची मोहीम नगरमधील वृक्षप्रेमींनी सुरू केली आहे. राज्यफुल आपल्या दारी उपक्रमातून ताम्हण वृक्षाची दीड हजार रोपे तयार करून ती विविध शाळांतून लागवडीचा उपक्रम सुरू केला आहे.

महाराष्ट्राचे राज्यफुल असलेले ताम्हण हे जारूल या नावानेही प्रसिद्ध असलेल्या वृक्षाचे शास्त्रीय नाव लार्जेस्ट्रोमिया इंडिका असे आहे. विदेशी लोक या झाडाला "भारताची शान" असेही म्हणतात. कारण, उन्हाळ्याच्या सुरुवातीला याचे झाड पूर्णपणे निळसर-गुलाबी रंगाच्या मनमोहक फुलांनी बहरून जाते. यावेळी राज्यफुलपाखरू ब्लू मॉरमॉन सह इतर अनेक सुंदर फुलपाखरे व मकरंदावर उपजीविका करणारे कीटक तसेच छोटे पक्षी याकडे आकर्षित होतात. पाने मोठी असल्यामुळे शिंपी, वटवट्यासारखे पक्षी यावर आपले घरटे बनवतात. म्हणूनच पर्यावरणातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी हा वृक्ष महत्वाची भूमिका बजावतो. सुंदर दिसण्याबरोबरच या वृक्षाचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत. राज्यफुल असूनदेखील हा वृक्ष दुर्लक्षित व दुर्मिळ होत चालला आहे. म्हणून या अनमोल व सुंदर वृक्षाचे संवर्धन करणे आद्य कर्तव्य समजून नगरच्या वृक्षप्रेमींनी राज्यफुल आपल्या दारी उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा निसर्गप्रेमी व जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र, प्रियदर्शनी पब्लिक स्कुल (भिंगार) व श्रीअम्मा भगवान फाउंडेशन (नगर) यांच्या पुढाकाराने "राज्यफुल आपल्या दारी" या जिल्हास्तरीय उपक्रमाचे नगर येथील शासकीय निवासगृह येथे नुकतेच उद्धाटन झाले.

यावेळी प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रामदास हराळ, शिक्षणाधिकारी(प्राथमिक) रमाकांत काठमोरे, उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे यांच्यासह जिल्हा निसर्गप्रेमी टीमचे जयराम सातपुते, संदीप राठोड, अमित गायकवाड, संदीप भालेराव, शिवकुमार वाघुंबरे, सचिन चव्हाण, राजेंद्र बोकंद, अजिंक्य सुपेकर उपस्थित होते.

निसर्गप्रेमींनी प्रियदर्शनी स्कुल येथे पहिल्या टप्यात सुमारे दीड हजार ताम्हण वृक्षरोपांची यशस्वी निर्मिती केली व वर्षभर निगाही राखली. आता या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राज्यफुल म्हणून मानचिन्ह असलेल्या ताम्हण या वृक्षाचे रोप मोफत दिले जाणार आहे. या उपक्रमाचे शिक्षण सहसंचालक टेमकर यांनी कौतुक केले. महाराष्ट्राचे राज्यफुल ताम्हण या वृक्षाची व त्याच्य़ा फुलांची माहिती विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातूनच मिळत होती, पण राज्यफुल आपल्या दारी उपक्रमान्वये या वृक्षाच्या संवर्धनाबरोबरच प्रत्येक शाळेत या सुंदर फुलांचे सौदर्य अनुभवण्याची संधी सर्वांनाच मिळणार असल्याने नगर जिल्ह्याचा हा उपक्रम सर्व राज्यासाठीच अनुकरणीय व प्रेरणादायी असा आहे, असे गौरवोदगारही त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post