एएमसी मिरर वेब टीम
ठाणे : करोना रुग्णांची उपचाराच्या नावाखाली लूट करणाऱ्या खासगी कोविड रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरात बेकायदा सुरू असलेल्या तीन रुग्णालयांना टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि बायोमेडिकल सुविधा नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
कळवा येथील भास्करनगरमधील साईसेवा हेल्थ सेंटर, वाघोबानगर येथील जनसेवा रुग्णालय आणि मातोश्री आरोग्य केंद्र या तीन रुग्णालयांना टाळे लावण्यात आले आहे. या तिन्ही रुग्णालयाबाबत उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दोन वर्षांपूर्वी दाखल झाली होती. या याचिकेवर न्यायालयामध्ये काही महिन्यांपूर्वी अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने ही रुग्णालये बंद करण्याचा निर्णय दिला होता. याबाबत उच्च न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांना नोटिसा बजावून त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पाहणी केली होती. या तपासणीत या तिन्ही रुग्णालयांकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि बायोमेडिकल सुविधा नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे या रुग्णालयांना मार्च महिन्यात नोटिसा बजावून बंद करण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. त्यानंतरही तिन्ही रुग्णालये सुरूच होती. याबाबत माहिती मिळताच महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश नव्याने काढले. त्यानुसार आरोग्य विभागाच्या पथकाने तिन्ही रुग्णालयांना टाळे लावण्याची कारवाई केली, अशी माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांनी दिली.
अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र नाही
ठाणे महापालिका क्षेत्रातील ५० टक्के खासगी रुग्णालयांकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेली ही रुग्णालये बंद करावी, अशा स्वरूपाची एक वेगळी याचिका उच्च न्यायालयात काही वर्षांपूर्वी दाखल झाली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ठाणे महापालिकेने न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामध्ये शहरात ३८० खासगी रुग्णालयांची फेरनोंदणी करण्यात आली आहे. याशिवाय १८१ रुग्णालयांनी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. १२९ रुग्णालयांनी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. तसेच ७० रुग्णालयांनी हे प्रमाणपत्र घेतलेले नाही.
Post a Comment