बिहार निवडणूक नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली लढणार; भाजपाकडून घोषणा


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या दरम्यान भाजपा प्रदेश कार्य समितीची व्हर्च्युअल बैठकही पार पडली. या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा देखील सहभाग होता. या वेळी नड्डा यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी, संयुक्त जनता दल (जदयू) व लोक जनशक्ती पार्टी एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली.

बैठीकत नड्डा यांनी सांगितले की, भाजपा, जदयू आणि लोक जनशक्ती पार्टी जेव्हा जेव्हा एकत्र आले तेव्हा आपलाच विजय झाला आहे. आपण तिन्ही पक्ष मिळून ही निवडणूक लढवणार व विजयी होणार आहोत. भाजपाबरोबरच एनडीएतील सहकारी पक्ष असलेले जदयू आणि लोक जनशक्ती पार्टीचा देखील निवडणुकीत विजयी होतील. तसेच, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जाईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

विरोधी पक्षावर निशाणा साधत नड्डा म्हणाले की, बिहार व देशात विरोधी पक्ष पूर्णपणे संपुष्टात आला असून, विरोधी पक्षाकडून केवळ पोकळ राजकारण केले जात आहे. याचबरोबर नड्डा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोट्या-छोट्या बैठका आयोजित करून प्रचार सुरू करण्याचेही आवाहन केले. तसेच, घरोघरी जाऊन नितीश कुमार यांनी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यास देखील त्यांनी सांगितले.

जेपी नड्डा म्हणाले की, बिहारमध्ये सध्या लॉकडाउन आहे. त्यामुळे आपण ६ सप्टेंबर नंतर बिहारला नक्कीच जाणार आहोत. भाजपाला आपल्या सहाकरी पक्षांना देखील विजयी करायचे आहे, यासाठी देखील पक्ष कार्यकर्त्यांना जोर लावावा लागणार आहे. करोना काळात निवडणूक होत असल्याने हे एक मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

Post a Comment

Previous Post Next Post