एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : सोमवार पासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनावर यंदा करोनाचे सावट आहे. अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास नसल्याने मंत्र्यांकडून फक्त लेखी प्रश्नांना उत्तरे देण्यात येत आहे. २०१५ पासून बॅंक घोटाळ्यातील ३८ आरोपी देशाबाहेर पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआय ज्या बॅंक घोटाळ्यांचा तपास करत आहेत त्यातील हे आरोपी आहेत. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी संसदेत ही माहिती दिली.
सीबीआयने म्हटले आहे की, बँकांमधील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणातील ३८ आरोपी १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान देशातून पळून गेले आहेत, असे अनुराग ठाकुर यांनी सांगितले.
ईडीने २० आरोपींच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्यासाठी इंटरपोलकडे विनंती केली आहे. १४ आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी विविध देशात अर्ज करण्यात आले आहेत. फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८ नुसार ११ लोकांविरुद्ध कारवाईसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र फसवणुक करणाऱ्यांनी किती घोटाळा केला आहे याची कोणतीही माहिती दिलेली नाही.
बॅंक घोटाळ्यातील आरोपींमध्ये ९००० कोटींचा घोटाळा करणारा विजय माल्या, १२,००० करोडचा बॅंक घोटाळा करणारा मेहुल चोक्सी तसेच पंजाब नॅशनल बँकमध्ये १४ हजार कोटींचा घोटाळा करून लंडनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या परिवारातील काही लोकांचा समावेश आहे. त्यापैकी पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील आरोपी सनी कालरा आणि बॅंकासोबत ४० करोड रुपयांचा घोटाळा करणाऱ्या विनय मित्तल यांना भारतात परत आणण्यात आले आहे.
Post a Comment