सुट्ट्या मिठाईलाही आता कालमर्यादेचे बंधन; १ ऑक्टोबरपासून नियमांची अंमलबजावणी होणार

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
लाडू, पेढे-कलाकंद, बर्फी वा अन्य प्रकारच्या सुटय़ा मिठाईच्या सेवनाची कालमर्यादा ग्राहकांना सांगणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या या कायद्याची गुरुवारपासून (१ ऑक्टोबर) देशभर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मिठाईच्या दुकानांतून पॅकबंद मिठाईसह सुटी मिठाईही विकली जाते व या सुटय़ा मिठाईला मागणीही असल्याने तिची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, त्यावर ती मिठाई कधीपर्यंत चांगली राहू शकेल (बेस्ट बिफोर) हे यापूर्वी लिहिले जात नव्हते. त्यामुळे खरेदी केलेला पदार्थ किती दिवस चांगला राहू शकतो, हे ग्राहकांना समजत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन हा नवा कायदा लागू करण्यात आला आहे. देशातील अनेक मिठाई दुकानांतून पॅकेजिंग न करता विक्री केली जाते. काही दुकानांमधून छोटय़ा प्लास्टिक बॉक्समधून मिठाई पदार्थाची विक्री केली जाते. मात्र, संबंधित पदार्थ नेमका किती दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो, याचा उल्लेख अनेकदा नसतो. नव्या कायद्यानुसार उत्पादकांना अन्नपदार्थावर कालमर्यादेचा उल्लेख बंधनकारक करण्यात आला आहे.

कालमर्यादेचा उल्लेख नसलेल्या पदार्थाची मुदत संपली, असे गृहीत धरून गुरुवारपासून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. मिठाईमध्ये असलेल्या खव्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते, ही बाब ध्यानात घेऊन या कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. या कायद्यानुसार कालमर्यादेचा उल्लेख नसल्यास संबंधित व्यापाऱ्याला एक लाख रुपयांपर्यंत दंडाची कारवाई होऊ शकते, असे अन्न व औषध प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post