वर्गाला नाही टॅब.. विद्यार्थी वळताहेत जनावरे; माजी आमदार पिचडांनी काढले अकोल्यातील शिक्षणाचे वाभाडे


एएमसी मिरर वेब टीम
अकोले :
''अकोले तालुक्यातील शिक्षक ऑनलाईन पध्दतीने किती विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवत याचा आढावा मतदार संघाच्या दौऱ्यात घेतला, तर अनेक विद्यार्थी वर्गाला टॅब नसल्यामुळे जनावरे वळताना दिसून आले, अनेक शिक्षक शाळेवर न गेल्यास मुख्यालयात राहणे बंधनकारक असताना कोणत्याही विभागात दिसून आले नाही. प्रभारी गटशिक्षण अधिकार्‍यांनी कोणत्याही शाळेला भेट दिली नाही'', अशा शब्दात अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी अकोल्यातील शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढले.

पिचड यांनी नुकतेच पंचायत समितीच्या आढावा बैठकीत बोलताना अकोले तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1 ते 8 पर्यंत 16 हजार 813 विद्यार्थी असून 13 हजार 194 विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेत आहेत, शिक्षण विभागाचे यावर लक्ष असून ज्या ठिकाणी नेटवर्क मिळत नाही, तेथे तसेच ज्या विद्यार्थी-पालकाकडे अ‍ॅनड्राईड मोबाईल नाही, त्यांच्याकडे स्वतः जावून अध्यापनाचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, गटशिक्षण अधिकार्‍यांकडून ही खोटी माहिती दिली जात असल्याचा दावा पिचड यांनी केला. 2013 सालापासून ते आजपर्यंत पंचायत समिती शिक्षण विभागाचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी असल्यापासून शिक्षणाचे तीन तेरा, नऊ बारा वाजविले, खोटी माहिती शासन व अधिकारी यांना देवून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले, अनेक शिक्षकांना पाठिशी घालण्याचे काम केले जात असल्याचा आरोप पिचड यांनी केला. तालुक्यात 1125 शिक्षक कार्यरत असताना, यापैकी नियुक्तीच्या ठिकाणी किती राहतात, याची माहिती देण्याची मागणीही त्यांनी केली. अनेक विभागात शिक्षक शाळेवर न जाता त्यांनी गावातील रोजंदारीवर तरुणांची नियुक्ती केली हे प्रकारदेखील दौऱ्याच्यावेळी अनेक भागात पाहावयास मिळाले, असा धक्कादायक दावाही त्यांनी केला.

पर्यटकांचे फिटनेस सर्टिफिकेट घ्या
विधानसभेत आमदारांना आधिवेशनात सहभागी होण्यासाठी फिटनेस सर्टिफीकेटची मागणी केली जाते तर अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील पर्यटन स्थळाकडे येणार्‍या पर्यटकांचेही फिटनेस सर्टिफिकेट असल्यानंतरच स्थानिक कमिटीच्या निर्णयानुसार त्यांना या भागात फिरण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पिचड यांनी केली. या बैठकीस पेसा ग्रामपंचायत सरपंच परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत गोंदके, महिला तालुकाध्यक्ष सविता वरे, तालुका सरचिटणीस व भंडारदराचे सरपंच पांडुरंग खाडे, वारंघुशीचे सरपंच अनिता कडाळी, सयाची आसवले, गणपत खाडे, गंगाराम धिंदळे, त्रिंबक बांडे, सुरेश मोरे, रोहिदास इदे, मारुती बांडे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post