प्राण्यांच्या संऱक्षणासाठी संवेदनशील सरसावले...नगरमध्ये वाघ्या फाउंडेशन झाले स्थापन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मुक्या प्राण्यांना कोणी वाली नसल्याचे बोलले जाते व त्यामुळे त्यांच्यावर अन्याय व अत्याचारही होतात. पण आता यातून त्यांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. मुक्या व पाळीव प्राण्यांना संरक्षण देण्य़ासाठी नगरमध्ये वाघ्या फाउंडेशन या संस्थेची स्थापना झाली आहे. ही संस्था व त्यातील सदस्य मोकाट कुत्री, पाळीव जनावरांना नियमित अन्न पुरवण्यासह त्यांना स्वतःचे हक्काचे घरही करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

मनसेचे नेते सुमित वर्मा यांनी मुक्या प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राधिका रणभोर, सायली आठरे, अमोल कनगरे, विनोद बन, शुभम शिरसाठ, कीर्ती कांजवणे, दिया कोठारी, कीर्ती बेलेकर, पूनम तोरडमल, अमित वाघचौरे, दर्शन काळे आदींच्या मदतीने त्यांनी वाघ्या फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ, औषधोपचार, शस्त्रक्रियासंदर्भात काम करण्यात येणार आहे. यासाठी सर्व गोष्टी सेवाभावी असणार असून त्यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार नसणार. त्याचप्रमाणे प्राण्यांना संरक्षण देण्यासाठीचे कामही या संस्थेच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली. महापालिका प्रशासन आणि जिल्हा वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मुक्या प्राण्यांसाठी असलेल्या कामावर आता वाघ्या फाऊंडेशनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. कारण, भटक्या जनावरांसाठी जे काम प्रशासनाकडून अपेक्षित आहे, ते काम आजपर्यंत झालेले नाही. म्हणून आता वाघ्या फाऊंडेशन यासाठी काम करणार असल्याचेही सांगण्यात आले.

काही बौद्धिक दिवाळखोर लोकं दिवाळीमध्ये प्राण्यांच्या शेपटीवर फटाके फोडतात तर काही रंगपंचमीच्या वेळी प्राण्यांवर रंग टाकतात. यातून नाना प्रकारच्या व्याधी प्राण्यांना होतात, यावर काम करणे गरजेचे असल्याने प्राणी संरक्षण कायद्यांची जनजागृती आणि मुक्या प्राण्यांना अशा प्रकारचे त्रास देणाऱ्या लोकांना याचे काय परिणाम भोगावे लागतील, याची जाणीव आता वाघ्या फाऊंडेशनच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्राणी मित्रांच्या सहकार्याने लवकरच मुक्या प्राण्यांसाठी एक हक्काचे घर देखील शेल्टर हाऊसच्या माध्यमातून सुरू करण्याचे नियोजन आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वजण माणसांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी धडपडत होते; तेव्हा मुक्या प्राण्यांसाठी सुद्धा काही करायला हवे, या विचारांतून या कामाची सुरुवात म्हणून शहरातील प्राणी मित्रांना एकत्र करून वाघ्या फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या कामकाजाची माहिती आणि सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक घेऊन काम सुरू करण्यात आले आहे. या संघटनेत प्राणी मित्रांनी सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी मो.9860521022 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post