मोटार सायकलची चोरी.. अशीही आणि तशीही..


एएमसी मिरर वेेेब टीम
अहमदनगर : अपघातात जखमी झाल्याने एकाला काहीजणांनी दवाखान्यात दाखल केले व तिकडे अपघातस्थळावरून त्याची मोटारसायकल गायब झाली तर दुसऱ्या घटनेत एकाला मोटारसायकल चालवायला दिली तर त्याने काही कारणाने गाडीच्या मालकाला रस्त्यात उतरून देऊन गाडी घेऊन पोबारा केला. सध्या मोटार सायकलींच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पण पार्किंगमध्ये लावलेली गाडी बनावट चावीने सुरू करून घेऊन जाणे वा कोठे लावलेल्या गाडीचे कुलूप तोडून ती पळवून नेण्याच्या घटना नेहमी घडतात. सध्या तर त्या खूप वाढल्याही आहेत. मात्र, नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमध्ये मोटारसायकलींची चोरी विस्मयकारक ठरली. 

या प्रकरणी पाथर्डी व सोनई पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. मिडसांगवी (ता. पाथर्डी) येथील विष्णू थोरात १० सप्टेंबरला पाथर्डीला मोटारसायकलवरून जात असताना रात्री ९च्या सुमारास फुंदेटाकळी शिवारात त्यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी अचानक रस्त्याच्या खाली गेल्याने ते घसरून पडले व त्यांना मार लागला. त्यावेळी त्या रस्त्याने येणाऱ्या-जाणारांपैकी कोणीतरी त्यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यानंतर जेथे अपघात घडला त्या ठिकाणी असलेली त्यांची मोटारसायकल, मोबाईल व लॅपटॉप तसेच थम्ब इंप्रेशनचे मशीन गायब झाले. त्यांनी याबाबत पाथर्डी पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मोटारसायकल लांबवण्याची दुसरी घटना ९ सप्टेंबरला सायंकाळी ४च्या सुमारास घडली. सोनई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रामकृष्ण ढोक यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी अनोळखी व्यक्तीला बुलेटवर लिफ्ट दिली. तुझे पाय दुखत असतील म्हणून मी मोटारसायकल चालवतो असे म्हणून त्या व्यक्तीने ढोक यांना पाठीमागे बसवले. रस्त्याने जात असताना नगर रस्त्यावरील शेंडी बायपास येथे रस्त्यात उभ्या असलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींना पैसे देऊन ये, असे सांगून त्या व्यक्तीने ढोक यांना तिकडे पाठवले व ते गेल्यावर इकडे बुलेट घेऊन पोबारा केला. फसवणुकीच्या या प्रकारातील चोरट्याचा शोध पोलिसांनी आता सुरू केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post