पंतप्रधानांचा वाढदिवस होणार आगळावेगळा; जिल्हा भाजपचे नियोजन


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : प्रत्येक मंडलात 70 दिव्यांगांना विविध प्रकारचे कृत्रिम अवयव, 70 रक्तदान शिबिरे व प्रत्येक बूथवर 70 वृक्षांची लागवड...अशा ७०च्या पटीत सामाजिक उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त करण्याचे नियोजन जिल्हा भाजपने केले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा भाजपच्यावतीने 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक मंडलात 70 दिव्यांगांना विविध प्रकारचे कृत्रिम अवयव, गरीब व गरजूंना चष्मे वाटप, रुग्णांना फळांचे वाटप, करोना बाधितांना प्लाझ्मादान असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. युवा मोर्चातर्फे 70 रक्तदान शिबिरे, प्रत्येक बूथवर 70 वृक्षांची लागवड, पर्यावरण रक्षणाचा संकल्प, प्लास्टिकमुक्तीचा संकल्प, स्वच्छता अभियान असे कार्यक्रमही होणार असल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख सचिन पोटरे यांनी दिली.

उपाध्याय व गांधींना अभिवादन उपक्रम
त्याचबरोबर पंडित दीनदयाळ उपाध्याय व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रमांनी भाजपद्वारे साजरी केली जाणार आहे. या काळात आत्मनिर्भर भारतचा संकल्प विविध प्रकारच्या संवाद कार्यक्रमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार असून यामध्ये खादीचा उपयोग, स्वदेशीचा वापर, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा भाजपच्या बैठकीत जिल्हा प्रभारी व तालुकानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

प्रसाद ढोकरीकर (जिल्हा प्रभारी), पारनेर- बाळासाहेब महाडीक व दादासाहेब बोठे, राहुरी- दिलीप भालसिंग व संतोष लगड, श्रीगोंदा- सचिन पोटरे, शेवगाव- शाम पिंपळे व युवराज पोटे, पाथर्डी- रवींद्र सुरवसे व पांडुरंग उबाळे, नगर- अशोक खेडकर व सुनील थोरात, जामखेड- वाय. डी. कोल्हे व धनंजय बडे, कर्जत- सुभाष गायकवाड व संतोष रायकर.

Post a Comment

Previous Post Next Post