'माझे कुटुंब' मोहिमेत काँग्रेसचे १०० कोरोनादूत उतरणार; शनिवारी नगरला मोहिमेचे उद्घाटन


 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या अभियानाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी नगर शहर जिल्हा काँग्रेसचे १०० कोरोनादूत जनजागृती करणार आहेत. या मोहिमेची सुरुवात शनिवारी (१९ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता सावेडी रस्त्यावरील माऊली सभागृहात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.


काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या जनजागृती मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सांगितले की, मंत्री थोरात यांच्या सूचनेनुसार हे अभियान नगर शहरामध्ये हाती घेतले आहे. आ.डॉ.सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबवणार आहोत. या अभियानाच्या माध्यमातून शहर जिल्हा काँग्रेसचे शंभर कार्यकर्ते कोरोनादूत म्हणून पूर्णवेळ काम करणार आहेत. एक महिना चालणाऱ्या या अभियानामध्ये पुढील चार आठवड्यातील प्रत्येकी तीन दिवस काँग्रेसचे कोरोनादूत शहरातील १७ प्रभागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन गृहभेटी भेटी देत जनजागृती करणार आहेत. जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना समाजात वावरत असताना पूर्णवेळ मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाची डॉक्टरांची टीम या अभियानात लोकांना मास्कचा शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि परिणामकारकरीत्या कशा पद्धतीने वापर करावा याबद्दलचे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. मास्क योग्य प्रकारे न वापरल्यामुळे कोरोना झाला असल्याच्या अनेक घटना घड़ल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना याबाबत तंत्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षित करण्याचे काम काँग्रेसची टीम या अभियानामध्ये करणार असल्याचे काळे यांनी सांगितले आहे. 

 

गृह भेटींच्या वेळी कोरोनासंदर्भामध्ये नागरिकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड मिळणे यासारखी लागणारी अत्यावश्यक मदत तातडीने मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाची हेल्पलाईन म्हणून जाहीर केलेला वैयक्तिक मोबाईल क्रमांक शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. नगर शहरात आरोग्य विषयी काम करणाऱ्या संस्था, संघटना तसेच नागरिकांनी काँग्रेस पक्षाच्या या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष काळे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post