पळून जाणार नाहीत, अशांनाच संघटनेत संधी द्या; आ. डॉ. तांबेंनी दिला काँग्रेस नेत्यांना सल्ला


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : नगर शहराच्या काँग्रेस संघटनेत विविध पदांवर स्थान देत असताना, जो कार्यकर्ता कोणत्याही गोष्टीला वा आमीषाला बळी न पडता पळून जाणार नाही व काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहील अशाच कार्यकर्त्यांना विविध पदांवर संधी द्यावी, असा सल्ला नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिला आहे.

माऊली मंगल कार्यालयात झालेल्या शहर कॉंग्रेसच्या पहिल्या संघटनात्मक बैठकीत आ.तांबे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी महापौर दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, अॅड. माणिकराव मोरे उपस्थित होते.

डॉ. तांबे यांनी नगर शहर काँग्रेसच्या प्रगतीशील वाटचालीचा गौरव केला तर नवे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे उच्चशिक्षित असून, त्यांना सामाजिक कार्याचा वारसा असल्याने युवा नेतृत्व नगर शहर काँग्रेसला मिळाल्याचे गौरवोदगार आ. कानडे यांनी व्यक्त केले. नगर शहरात निश्चितपणे काँग्रेसची संघटना अल्पावधीत उभी राहील, असा विश्वासही व्यक्त केला.

काळेंनी डागली तोफ
यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पक्षांतर्गत कुरघोड्या करणाऱ्यांचा समाचार घेतला. जी लोक चार पक्षांचे उंबरे झिजवतात, अशांना इथून पुढे पक्षात कवडीचीही किंमत दिली जाणार नाही, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. तसेच, अशांनी दिल्या घरी सुखी राहावे आम्ही फाटक्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊ. गोरगरीबांना पुढे आणू. सामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या माध्यमातून नेता बनवू. पण पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना इथून पुढे कोणत्याही परिस्थितीत पक्षात थारा दिला जाणार नाही, असे सांगत काळे यांनी यावेळी कोणाचेही नाव न घेता अनेकांवर सूचकपणे तोफ डागली.

Post a Comment

Previous Post Next Post