तो पोटतिडिकेने सांगतोय.. पण ऐकत कोणीच नाही..; राजूरमध्ये कोरोना जनजागृती करणाराची खंत

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
तोंडाला मास्क लावा हो... हात धुण्यासाठी सॅनिटायझर वापर करा हो...सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका व सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) पाळा हो...अशी पोटतिडिकीने आळवणी करणाऱ्याकडे अकोले तालुक्यातील राजूरमधील जनता चक्क दुर्लक्ष करीत आहे. रोज दिवसभर राजूर ग्रामपंचायतीचा शिपाई दशरथ जाधव शहरभर जनजागृती करीत फिरत आहे, पण भाजी घेण्यासाठी, किराणा घेण्यासाठी वा अन्य काही कारणांसाठी राजूरकर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीतच आहेत. या प्रकारामुळे जाधवही अस्वस्थ होत आहेत. पण कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशु कदाचन...म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहण्याचे गीतासार मनात ठेवून कोरोना जनजागृतीचा हाती घेतलेला वसा त्यांनी उत्साहात सुरू ठेवला आहे.

गावात कोरोना आला आहे... त्याने शतकं (रुग्ण संख्या) पार केली आहेच.. तुमच्या दारात तो उभा आहे... जबाबदारीने वागा...घरात बसा...उगाच बाहेर फिरू नका... काम असेल तरच बाहेर पडा...तुम्हाला हात जोडून व पाया पडून विनंती आहे... माय-बापांनो...असे ग्रामपंचायत शिपाई दशरथ सखाराम जाधव पोटतिडिकेने सकाळी ७ ते रात्री उशिरापर्यंत गाडीला स्पीकर लावून ओरडून प्रबोधन करीत आहे .पण ऐकतील ती माणसे कशी? राजूर शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. रुग्णांचा आकडा शतक पार करून पुढे गेला आहे. ४० गावांचे केंद्र असलेले राजूर कोरोनाबाधित होत आहे. राजूर ग्रामीण रुग्णालयात रोज दहा-पंधरा रुग्ण सापडत आहे. स्वॅब तपासणी कीट संपले आहेत. उपचार घ्यायचे तर अकोले-संगमनेर येथेही बेड उपलब्ध नाहीत. तरीदेखील लोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. सोशल मीडियावर फक्त आवाहन केले जाते. मात्र, सामाजिक कार्यकर्ते वा संस्था पुढे येत नाही. महसूल, पोलीस, स्थानिक कमिटी यांनी एकत्र येऊन नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, मध्यंतरी मतभेद झाल्याने यंत्रणा ढेपाळली आहे. पुढारी-अधिकारी यांचे काही असो मात्र राजूर ग्रामपंचायत शिपाई रोज सकाळी उठून कोरोनचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्पीकर लावून नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र, जे व्यावसायिक बाधित होऊन उपचारानंतर परत आले, त्यांनी होम क्वारंटाईन होण्याऐवजी दुकाने उघडल्याने अडचणी वाढत आहेत.

याबाबत राजूर ग्रामपंचायतीचे सरपंच गणपत देशमुख म्हणाले, राजूर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी तालुका प्रशासनाने तटस्थ भूमिका न घेता पोलिस, महसूल,स्थानिक कमिटी एकत्र येऊन कोरोनाचा मुकाबला करता येईल तसेच यात कृपया राजकारण आणू नये व प्रशासनाने सरपंच, स्थानिक कमिटीला अधिकार देणे आवश्यक आहे. केवळ दंड करून प्रश्न सुटणार नाही, असे म्हणणे त्यांनी मांडले. या पार्श्वभूमीवर, कोरोना जनजागृती दिवसभर करणाऱ्या जाधव यांच्याबद्दल संवेदनशील राजूरकर गौरवोदगार व्यक्त करीत त्यांचे कौतुकही करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post