कोरोना महामारीच्या उच्चाटनासाठी नगरला विश्व हरिनाम उत्सव


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जागतिक महामारी असलेल्या कोरोनाचे समूळ उच्चाटन होण्यासह अखिल विश्वभरास शांती लाभण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे (इस्कॉन) गुरुवार १७ सप्टेंबर ते बुधवार २३ सप्टेंबरदरम्यान विश्व हरिनाम उत्सव (वल्ड॔ होलीनेम फेस्टीवल) आयोजन करण्यात आले आहे.

नगर शहरातील इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक गिरीवरधारी प्रभू यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर आणि जिल्ह्यातही वल्ड॔ होलीनेम फेस्टीवलनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी माहिती देताना ते म्हणाले, इस्कॉनतर्फे संपूर्ण विश्वभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मेक पिपल फॉर्च्युनेट या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक व्यक्तीने जागतिक महामारी कोरोनाचे समूळ उच्चाटन व्हावे आणि विश्वास शांती लाभावी या सद्हेतूने हरे कृष्ण... महामंत्राचा जप किमान एक वेळ करावा. हा महामंत्र म्हणतानाचा स्वतःचा व्हिडिओ काढून तो राहुल गुजराल (८९०३३९८१६९) किंवा मुकुंद जोरी (७०२८२८४३१६) यांच्या व्हॉटसअप नंबरवर पाठवावा. जनतेने केलेल्या हरे कृष्ण... महामंत्राचे व्हिडीओ प्राप्त होताच ते सर्व इस्कॉन मंदिरांच्या माध्यमातून इंटरनेटवर अपलोड केले जाणार आहेत.

रविवारी (२० सप्टेंबर) संडे जपाथॉन म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा नामजप सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत चालेल. या कालावधीत हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे | हरे राम हरे राम राम राम हरे हरे || या महामंत्राच्या स्टीकर्सचे वाटप केले जाईल. ५००० लोकांची प्रत्यक्ष भेट घेऊन हरे कृष्ण... महामंत्राच्या स्टीकरची भेट दिली जाईल. हा हरे कृष्ण...महामंत्र भाविकांना वेगवेगळ्या शैलीत कल्पकतेने मांडता यावा म्हणून खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी हरे कृष्ण...हा संपूर्ण महामंत्र आपल्या घरीच रंगवून त्या चित्राचा फोटो मदन थोरात यांच्या ९२७१३८९९२८ या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवण्याचे सांगण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे पाचशे एक, तीनशे एक व दोनशे एक रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

१७ ते २३ सप्टेंबरकालावधीत रोज सायंकाळी ५ ते ९ या वेळेत इस्कॉनतर्फे विविध कार्यक्रम होणार असून सायंकाळी ५ ते ६ या वेळेत नगर शहरातील वेगवेगळ्या भागात हरे कृष्ण... महामंत्र कीर्तनाची गाडी फिरणार आहे. घरात बसलेल्या सर्वांच्या कानावर हा महामंत्र पडावा व त्यांच्याकडून हरे कृष्ण... महामंत्राचे उच्चारण व्हावे या हेतूने ही गाडी नगर शहरातील विविध भागात पोहोचेल. नगर शहरासह जिल्ह्यातील घराघरात किमान एक तास कुटूंबातील सर्वांनी हरे कृष्ण... महामंत्राचे कीर्तन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post