कोविड लढाईसाठी भाजपा सज्ज; उद्या कोविड सेंटरचे उद्घाटन : महापौर बाबासाहेब वाकळे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. परिणामी, कोरोना रुग्णांवर उपचार होण्यास विलंब होत आहे. यासाठी शहर जिल्हा भाजप, अहमदनगर मनपा व पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद रोडवरील नटराज हॉटेल येथे कोविड सेंटर कार्यरत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या हस्ते व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दि.5 रोजी दुपारी 4 वाजता या कोविड सेंटरचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

महेंद्र गंधे म्हणाले की, गोरगरीब रुग्णांना पैशाअभावी योग्य व प्रभावी उपचार मिळणे कठीण झाले आहे. यासाठी शहर भाजपाच्यावतीने नगर शहरामध्ये नामांकित डॉक्टरांना सोबत घेऊन कोविड सेंटर नगरकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. हे कोविड सेंटर नगरकरांना मोफत सेवा देणार आहे, असे ते म्हणाले.

वसंत लोढा म्हणाले की, अहमदनगर शहर भाजपा व पंडीत दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कोविड सेंटर सुरु करत आहे. पंडीत दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे आर्थिक योगदान या कोविड सेंटरला मिळणार आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार केले जाणार आहे. गोरगरीब जनता उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी शहरासह जिल्ह्यातील रुग्णांना भाजपा मदत करणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post