आधी शंकरमहाराज प्रतिमा झाली विराजमान.. मग, सभापती कोतकरांनी कार्यभार स्वीकारला

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
बहुतांश राजकारणी मंडळी राजकीय पद स्वीकारण्याआधी आपल्या इष्ट देवतेचे स्मरण व पूजन करतात. काहीजण मंत्रोच्चारात पदग्रहण करतात. महापालिकेच्या स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकरही या भावभक्तीला अपवाद ठरले नाहीत. सिद्धपुरुष शंकर महाराज यांच्या प्रतिमेला त्यांनी आधी सभापतीपदाच्या खुर्चीत विराजमान केले, त्या प्रतिमेची साग्रसंगीत पूजा केली व त्यानंतर दुसऱ्या खुर्चीत बसून त्यांनी सभापतीपदाचा पदभार घेतला. दरम्यान, महापालिका स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी निम्मे सदस्य दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस निवृत्त होतात व त्यांच्या जागी नवे सदस्य नियुक्त झाल्यावर नव्या सभापतीपदाची निवड होते. या पार्श्वभूमीवर, नव्या सभापतींना अवघ्या चार महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता आहे. 'मात्र, पहिल्या बहुजन समाज पक्षाच्या सभापतीने १९ महिन्यांचा कार्यकाळ उपभोगल्यावर आम्हालाच चार महिने कसे, असा सवाल कोतकर समर्थकांतून होत असून, बघू येत्या जानेवारी-फेब्रवारीत काय करायचे ते', अशा सूचक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद महापौरपदाच्या खालोखाल महत्त्वाचे असते. मनपाचे बहुतांश अर्थकारण याच पदाच्या भोवती फिरत असते. त्यामुळे या पदावर वर्णी लागण्याची सुप्त इच्छा प्रत्येक नगरसेवकाची असते. कोतकर यांनीही भाजपचे असताना राष्ट्रवादीत जाऊन हे पद पटकावले आहे. त्यावरून राजकीय वादंग पेटले आहे. शिवसेना नाराज झाली आहे तर राष्ट्रवादी-भाजपने 'कोतकर आमचेच असल्याचा' दावा केला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत, भाजपने कोतकरांना ते नेमके कोणत्या पक्षात आहेत, याचा खुलासा करण्याची नोटीसही बजावली आहे. या सगळ्या गदारोळाकडे व वादंगाकडे दुर्लक्ष करून सभापती कोतकर यांनी सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पदभार स्वीकारला. सिद्धपुरुष शंकर महाराजांच्या प्रतिमेची त्यांनी पूजन केल्यावर मनपाचे विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर व राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी सभापतीपदाच्या खुर्चीत त्यांना बसवले. यावेळी त्यांचा त्यांनी सत्कारही केला. नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, सुनील कोतकर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा कोतकर समर्थकांनी जोरदारपणे दिल्या. राष्ट्रवादीची ही मंडळी काही वेळानंतर निघून गेल्यावर भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे व भाजप नगरसेवकांनीही आवर्जून येऊन सभापती कोतकर यांचा सत्कार केला.

त्यांच्या पक्ष प्रवेशाची पावती केली : बारस्कर
राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांनी स्थायी समिती सभापतीपदाचा पदभार घेतल्यानंतर शहरातील खड्डे दुरुस्ती व नागरी समस्यांच्या निवारणासाठी तातडीने नियोजन करण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे, असे विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांच्या पक्ष प्रवेशापूर्वीच शहर विकास व खड्ड़ेमुक्तीच्या कामाला प्राधान्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली होती, असे सांगून ते म्हणाले, कोतकर यांचा सर्वांसमोरच राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश झालेला आहे. त्यांची पक्ष सदस्यत्व पावतीही झालेली आहे. त्यांच्या गळ्यात पक्षाचा पंचा घालून त्यांचा प्रवेश केला आहे. महापौर त्यांना त्यांचे (भाजप) म्हणत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असेही बारस्करांनी आवर्जून स्पष्ट केले. शिवसेना नाराज असण्याचा प्रश्न नाही, राष्ट्रवादीचाच सभापती झाला आहे. राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे स्थानिक स्तरावरही सेना-राष्ट्रवादीचे मिळतेजुळते होत आहे. कोरोनामुळे सभापती पदभार स्वीकारताना गर्दी नको म्हणून केवळ आमच्या पक्षाच्या समर्थकांनाच येथे बोलावले आहे. सभापतीपदाच्या माध्यमातून शहर विकासाच्या कामाला प्राधान्य देण्याचे आमचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.

रंगले सवाल.. आणि सभापतींचे जवाब
सभापतीपदाचा पदभार घेतल्यावर सभापती कोतकर यांनी येत्या काळात शहर विकासावर भर देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यावर प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यावर त्यांची उत्तरेही मजेशीर ठरली. त्या उत्तरांची चर्चा नंतर महापालिकेतील चर्चेत अग्रस्थानी राहिली. यावेळी झालेले सवाल-जबाब असे...


प्रश्न : तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात?
उत्तर : आज फक्त शहर विकासाचा विषय आहे, यासाठीच प्रयत्न करण्यास मी प्राधान्य देणार आहे.

प्रश्न : तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला काय?
उत्तर : (काही काळ मौन बाळगून) शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका व जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी त्या-त्या ऑफिसात जाऊन व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून प्रश्न सोडवणार आहे.

प्रश्न : तुम्ही भाजप सोडला काय?
उत्तर : शहराच्या अमृत योजनेचा समन्वयक म्हणूनही माझी नियुक्ती झाली आहे. आता सभापती म्हणून जास्तीतजास्त धावपळ करून तो प्रश्न मार्गी लावणार आहे, जनतेला पूर्ण वेळ देऊन जास्तीतजास्त काम करणार आहे.

प्रश्न : भाजपचे संख्याबळ नव्हते म्हणून राष्ट्रवादीत तुम्ही प्रवेश केला काय?
उत्तर : नगर शहरात विकासाचे काम करायचे आहे, यासाठी मी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणार आहे.

प्रश्न : तुम्ही राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांचे आहात काय?
उत्तर : शहर विकासाच्या अनेक अडचणी आहेत, महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तरीही शहराच्या जास्तीतजास्त समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतो व थांबतो...रामकृष्ण हरी.

Post a Comment

Previous Post Next Post