मंत्री गडाखांना आता 'ती' दोस्ती तोडावी लागणार.. सेनेसाठी मनपा 'स्थायी'त लागणार कस


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : नगरमधील शिवसेनेचे आधारस्तंभ मानले जाणारे नेते (स्व.) अनिलभय्या राठोड यांच्यानंतर शिवसेनेचे जिल्ह्याचे नेतेपद जलसंधारण मंत्री शंकरराव गड़ाखांनी ताब्यात घेतले असले तरी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीत त्यांचा पहिल्यांदा कस लागणार आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी महाविकास आघाडी असली व तेथे भाजप विरोधात असला तरी नगरच्या महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी आघाडी सत्तेत व शिवसेना विरोधात आहे. राज्यात सेना-राष्ट्रवादीची दोस्ती असली तरी नगरमध्ये मात्र विळ्या-भोपळ्याचे नाते आहे व राज्यात राष्ट्रवादी-भाजपची दुश्मनी असली तरी नगरला दोस्ती आहे. ही दोस्ती आधी तोडण्याचे आव्हान मंत्री गडाखांसमोर आहे. शिवाय, त्यांना नगर शिवसेनेतील दोन गटांमध्ये समेट घडवण्यात पहिल्या टप्प्यात अपयश आले असल्याने आता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करून सेनेच्या दोन्ही गटांना एकत्र करणे व त्यानंतर नगर भाजपशी असलेली सलगी तोडायला लावून राष्ट्रवादीला सेनेच्या मदतीला घेण्याचे कसब गडाखांना दाखवावे लागणार आहे तरच मनपा स्थायी समितीचे सभापतीपद घेण्याचा भाजपचा मनसुबा उधळता येणे शक्य आहे. मनपा स्थायी समितीच्या सभापती निवडीतूनच गडाखांची नगरच्या राजकारणातील प्रत्यक्षातील एन्ट्री दमदार आहे की फुसकी, हे स्पष्ट होणार आहे व त्यानंतरच येत्या ९ महिन्यांनी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीची रणनीतीही स्पष्ट होणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची निवड ऑनलाईन पद्धतीने करण्यास विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्याने नव्या सभापतीपदाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. भाजपकडून मनोज कोतकर व शिवसेनेकडून श्याम नळकांडे असे दोन उमेदवार या पदाच्या शर्यतीत आहेत. महापालिकेत भाजपला मिळालेले महापौरपद राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने मिळाले असल्याने त्याची परतफेड राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपद बहाल करून झाली असली तरी येथील भाजप-राष्ट्रवादीची दोस्ती कायम आहे. या दोस्तीने राठोडांच्या हयातीत सेनेत दोन गट निर्माण करण्यात यश मिळवले आहे, ते गट राठोडांच्या निधनानंतरही कायम आहेत. सामाजिक प्रश्नांवर हे दोन्ही गट स्वतंत्र आंदोलने करतात व आपले अस्तित्व दाखवून देतात. अभिनेत्री कंगणा राणावत हिच्याविरोधात राज्यात शिवसेना आक्रमक असल्याने नगरमध्येही सेनेच्या दोन गटांनी स्वतंत्रपणे तिचा निषेध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने एका गटाने तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसात अर्ज देऊन केली तर दुसऱ्या गटाने रस्त्यावर येऊन कंगणाच्या छायाचित्राला जोडे मारून तिचा निषेध केला. अशा पार्श्वभूमीवर, या दोन्ही गटांमध्ये मनोमीलनाचे प्रयत्न मंत्री गडाखांनी मध्यंतरी केल्याचे सांगितले जात असताना, त्यात त्यांना यश आले नाही, हे दोन्ही गटांच्या स्वतंत्र आंदोलनांतून स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत मनपा स्थायी समितीचे सभापतीपद शिवसेनेला मिळवून देण्यात मंत्री गडाख कितपत यशस्वी होतात, यावर पुढील महापौरपद निवडणुकीत नेमके काय घडणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी महापालिकेत ती नाही व राठोड हयात असेपर्यंत ती होण्याची शक्यताही नव्हती. मात्र, आता त्यांच्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी महापालिकेतही येऊ शकते, असे काहींचे म्हणणे होते. पण महापालिकेच्या राजकारणात भाजप व राष्ट्रवादीची असलेली पक्की दोस्ती त्याला अडसर मानली जात आहे. ही दोस्ती तोडण्यात मंत्री गडाख कितपत यशस्वी होतात, यावर स्थायी समितीचे सभापतीपद सेनेला मिळते की भाजपला, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

महापालिकेत महापौर, उपमहापौर, महिला व बालकल्याण समिती सभापती व सभागृह नेता ही चार प्रमुख राजकीय दालने (केबीन) सत्ताधारी भाजपच्या ताब्यात आहे. विरोधी पक्ष नेता हे आणखी एक पाचवे प्रमुख दालन राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्तेच्या सहाव्या स्थायी समिती सभापती दालनाचे ध्येय भाजपने ठेवले आहे. मनपाच्या सत्तेत महिला व बालकल्याण समिती उपसभापतीच्या माध्यमातून शिवसेनाही सहभागी आहे. अशा स्थितीत त्यांनाही स्थायी समिती सभापतीपदाचे वेध लागले आहेत. स्थायी समितीत शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ५, भाजपचे ४ तसेच काँग्रेस व बहुजन समाज पक्षाचे प्रत्येकी १ असे १६ सदस्य आहेत. त्यांच्यातून नवा सभापती निवडला जाणार आहे. महापालिकेतील बहुतांश राजकीय पदे घोडेबाजारातूनच निवडली जाण्याचा इतिहास असल्याने सभापती निवडीची निवडणूक जाहीर होऊन ती होईपर्यंत किमान मनपाच्या राजकारणात काहीही होऊ शकते. अशा स्थितीत सेना-राष्ट्रवादीचे प्रत्येकी ५ सदस्य असल्याने या १० संख्याबळावर सेनेला सभापतीपद सहज मिळू शकेल, असा काहींचा होरा आहे. पण महापालिकेचे राजकारण इतके सोपे आहे की नाही, हे सभापती निवडीच्यावेळीच स्पष्ट होणार आहे. जिल्ह्याचे सेनेचे नेतृत्व मंत्री शंकरराव गडाखांनी आता स्वीकारले असल्याने सेनेला सभापतीपद मिळवून देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आली आहे. ती पार पाडण्यासाठी मनपातील राष्ट्रवादी-भाजप दोस्तीला सुरुंग लावण्याची धमक त्यांना दाखवावी लागणार आहे. ते होते की नाही, हे सभापती निवडीत स्पष्ट होणार आहे व त्याचे पडसाद त्यानंतर ८-९ महिन्यांनी होणाऱ्या महापौरपद निवडणुकीतही उमटणार आहेत.

मनपा स्थायी समितीचे सध्याचे सदस्य
शिवसेना- सुभाष लोंढे, योगीराज गाडे, सुवर्णा जाधव, श्याम नळकांडे व विजय पठारे. राष्ट्रवादी- गणेश भोसले, कुमारसिंह वाकळे, डॉ. सागर बोरुडे, परवीन कुरेशी व प्रकाश भागानगरे. भाजप- आशा कराळे, सोनाली चितळे, मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे. काँग्रेस-सुप्रिया जाधव. बहुजन समाज पक्ष- मुदस्सर शेख.

Post a Comment

Previous Post Next Post