तीन कोटीच्या एमआरआय मशीनला कुरतडले घुशी व उंदरांनी.. शिवसेनेने वेधले लक्ष

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
तब्बल तीन कोटी रुपये निधी वापरून नगर मनपाने आणलेले एमआरआय मशीन एखाद्या डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकावा, असे सावेडीतील सावित्रीबाई फुले मार्केटमध्ये ताडपत्रीखाली झाकून ठेवण्यात आल्याचा दावा शहर शिवसेनेने केला आहे. परिसरातील घुशी व उंदरांनी या मशीनभोवती असलेले लाकडी पॅकिंग पोखरले आहे व मशीनच्या वायरी कुरतडल्या आहेत. मागील सहा महिने अशीच स्थिती असल्याने यातील उच्च दर्जाच्या मॅग्नेटची क्षमता संपली असावी. हे मशीन चालू होण्याच्या स्थितीत नसल्याने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मातीमोल झाली आहे, असा दावाही शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे.

महापालिकेने नगरकरांना अल्प दरात एमआरआय स्कॅनिंग वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी हे मशीन खरेदी केले. त्यासाठी तीन कोटी रुपयांचा नियोजन मंडळांचा निधी वापरण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी महासभेची मंजुरी यासाठी घेण्यात आली होती. त्यावेळी महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी होते. त्यांच्याच सहीने हा एमआरआय मशीन खरेदी प्रस्ताव देण्यात आला होता. नगरकराना एक चांगली आरोग्य सेवा कमी पैशात मिळेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. पण आता सहा महिने उलटूनही हे मशीन जागेअभावी कोठेच बसविण्यात आलेले नाही, असा दावा जाधव यांनी केला आहे. मनपाने आणलेले हे एमआरआय मशीन चक्क सावेडीतील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटच्या आवारात डम्प केल्यासारखे ताडपत्री खाली झाकून ठेवण्यात आले आहे. कोरोना काळात नगरकरांच्या सतत सेवेत असण्याचा बडेजाव मिरवणाऱ्या महापौर व आयुक्तांचे आता करायचे काय असा संतप्त सवालही जाधव यांनी विचारला आहे. अगदी काल-परवाच या मशीनचे बिल संबंधित पुरवठादार कंपनीला अदा करण्यात आले आहे. त्यानंतर हे मशीन कोठे बसवण्यात आले आहे, अशी विचारणा पालिकेत गिरीश जाधव व सेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, काका शेळके यांनी केल्यावर पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर शिवसैनिकांनी या मशीनचा शोध घेतला असता त्यांना धक्काच बसला. हे एमआरआय मशीन सावेडीतील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटच्या आवारात अक्षरशः धूळखात पडून आहे. पावसाच्या पाण्याने हे यंत्र खराब होऊ नये म्हणून केवळ एक प्लॅस्टिक ताडपत्री यावर टाकण्यात आली आहे. बेवारस अवस्थेत हे मशीन शिवसैनिकांना सापडले, असा दावाही जाधव यांनी केला आहे.

एमआरआय मशीन कोठे बसवायचे हे जोपर्यंत निश्चित होत नाही, तोपर्यंत हे मशीन पालिकेला खरेदीच करता येत नाही. या मशीनमध्ये अतिउच्च क्षमतेचे मॅग्नेट असते. त्यामुळे हे मशीन आणण्यासाठी मुंबईच्या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राची रीतसर परवानगी घ्यावी लागते. असे असताना पालिका अधिकारी आणि पालिका पदाधिकाऱ्यांनी केवळ टक्केवारीसाठी हा मशीन खरेदीचा खटाटोप केला आहे, असा आरोपही जाधव यांनी केला आहे.

नगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात एकमेव सरकारी एमआरआय सेंटर आहे. जर पालिकेचे एमआरआय स्वस्त दरात सुरू झाले असते तर खासगी व्यावसायिकांचा धंदा बंद झाला असता म्हणून की काय पालिकेच्या आरोग्य खात्याने हे मशीन बसविण्याची तसदी घेतली नसावी. सध्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला आहे. कोरोनाच्या नावाखाली खासगी कोविड सेंटरमध्ये लुटालूट सुरू आहे, सामान्य नगरकर जीव मुठीत धरून वावरत आहे. तरी देखील पालिकेला हे मशीन सुरू करण्याचे सुचत नाही, यातून पालिकेचा आरोग्य विभाग आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची मिलीभगत आहे, हेच यातून दिसत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे.

महापालिका म्हणतेय ते मशिनच आमचे नाही!
एमआरआय मशिन संदर्भात ‘टर्म की प्रोजेक्ट’ची निविदा केलेली आहे. लोकमान्य नामक कंपनीला हे काम देण्यात आले आहे. एमआरआय सेंटर कार्यान्वित करुन त्यांनी मनपाकडे हस्तांतर करायचे आहे. मशिन आणणे, सांभाळणे, ते बसविणे, त्याची काळजी घेणे ही जबाबदारी आज मनपाची नाही. आजच्या स्थितीत हे मशिनही आमचे नाही. पूर्ण प्रोजेक्ट कार्यान्वित झाल्यानंतर आम्ही तो स्वीकारणार आहोत. त्यानंतरच त्यांना एकरकमी बिल अदा केले जाईल. सदर कंपनीला कोणतेही बिल देण्यात आलेले नाही, असे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले. 

 

जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करा : वारे
सद्यपरिस्थितीत कोरोनामुळे एमआरआय, सीटीस्कॅन सेंटरमध्ये रांगा आहेत. नागरिकांना हजारो रुपये मोजून खासगी व्यावसायिकांकडून सुविधा घ्यावी लागत आहे. महापालिकेने या प्रकल्पासाठी सहा महिन्यांपूर्वीच कार्यारंभ आदेश दिलेला आहे. या काळात मशिन बसवून सेवा उपलब्ध देणे आवश्यक होते. मात्र, अद्याप मशिनच बसविलेले नाही. वेेळेत प्रक्रिया पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी ही अधिकार्‍यांची असून, या प्रकरणी जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post