महापालिकेची शाळा ठरली आदर्श शाळा.. ओंकारनगर शाळेचा राज्यात होणार गौरव


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
आयएसओ मानांकन मिळवलेल्या ओंकारनगर (केडगाव) प्राथमिक शाळेला राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. महापालिकेच्या या शाळेचा झालेला हा गौरव महापालिकेच्या लौकिकात भर घालणारा ठरला आहे. महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार ओंकारनगर शाळेला जाहीर झाला असून, कोविडचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते हा पुरस्कार शाळेला प्रदान केला जाणार आहे.

राज्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या २७ शाळांची यंदाच्या आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे यांच्या मदतीने ओंकारनगर शाळेत डिजिटल क्लासरुम, शालेय परसबाग, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा मार्गदर्शन, बालवाचनालय, बाल आनंद मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल व क्षेत्रभेट, विविध दिनविशेष,टॉय बँक उपक्रम, कंपोस्ट खत प्रकल्प,रेन वॉटर हार्वेस्टिंग, सहशालेय स्पर्धा, क्रीडास्पर्धा, मूल्यवर्धन प्रकल्प असे विद्यार्थी विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. तसेच‌ पटसंख्येचा वाढता आलेख, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश,कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना शाळेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राबविलेले विविध उपक्रम,शाळेची शैक्षणिक गुणवत्ता या निकषांवरून ओंकारनगर शाळेला हा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे.

रोटरी क्लब,सहज फाउंडेशन,परेश पित्रोडा, देसाई परिवार, राजेंद्र कटारिया यांच्या सहकार्याने शाळेत सुमारे तीन लाख रुपये लोकसहभाग मिळवत विविध भौतिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.तसेच शाळेत सहकारी शिक्षक व पालकांच्या मदतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या शाळेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने पालकांकडून शिक्षकांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post