मनपा स्वीकृत निवड : शिवसेनेकडून दोन नावे सादर

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी नामनिर्देश सादर करण्याची आजची अंतिम मुदत आहे. सभेत पाच सदस्यांच्या निवडी होणार असून, यात शिवसेनेकडून दोन सदस्यांची नावे बंद पाकिटात नगरसचिव कार्यालयात सादर करण्यात आली आहेत.

मागील निवडीवेळी शिवसेनेकडून संग्राम शेळके व मदन आढाव यांची नावे देण्यात आली होती. तीच नावे यंदाही देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. स्व.अनिलभैय्या राठोड यांनी शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्याशी चर्चा करुन ही नावे निश्चित केलेली होती. तीच नावे सादर करण्यात आलेली असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून थोड्याच वेळात नावे सादर केली जाणार असल्याचे समजते. भाजपकडून रामदास आंधळे, किशोर डागवाले व सुवेंद्र गांधी यांची नावे चर्चेत आहेत. एका जागेसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून, प्रदेशाध्यक्षांपर्यंत या विषय नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रदेशाध्यक्षांकडूनच नाव अंतिम होईल, असा दावाही भाजपचे स्थानिक पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे कुणाचे नाव निश्चित होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

किशोर डागवाले यांनी भाजप व राष्ट्रवादीकडून स्वीकृतसाठी इच्छुक नसल्याचे जाहीर केले असले, तरी त्यांचे नाव अद्यापही चर्चेत असल्याचे बोलले जाते. भाजपकडून संधी न मिळाल्यास राष्ट्रवादीकडून ते सभागृहात जातील अशी चर्चा सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागील वेळी विपुल शेटीया व बाबासाहेब गाडळकर यांचे नाव देण्यात आले होते. शेटीया यांचे नाव कायम राहील, असे सांगितले जात आहे. मात्र, गाडळकर यांच्या निधनामुळे त्यांच्या जागेवर कुणाचे नाव दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे. शहराध्यक्ष माणिकराव विधाते यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळणार की, आणखी दुसरे नवीन नाव पुढे येणार? किशोर डागवालेंना संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा भाजपला धक्का देणार का? याबाबत मनपा वर्तुळात उत्सुकता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post