'पंचा' बदलला.. राजकारण फिरले; पवार व नार्वेकर ठरवणार नवा सभापती

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कधीकाळी एकाच दिवशी दोन-दोन महापौर निवडणाऱ्या नगरच्या महापालिकेत कधी व कसे राजकारण होईल, याचा थांगपत्ता कोणालाच लागत नाही. गुरुवारीही अशाच एका केवळ पक्षीय पंचा बदलण्याच्या राजकीय खेळीने एकाचवेळी राज्यातील महाविकास आघाडीही संभ्रमित झाली व भाजपलाही धोबीपछाड मिळाला. महापालिका स्थायी समितीचे सभापतीपद पटकावण्यासाठी भाजपचे केडगाव येथील नगरसेवक मनोज कोतकर यांनी चक्क भाजपचा 'कमळ' चिन्हाचा पक्षीय पंचा झुगारून देऊन राष्ट्रवादीचा 'घड्याळ' चिन्हाचा पंचा गळ्यात घातला व ते चक्क महाविकास आघाडीचे सभापतीपदाचे उमेदवारही झाले. दुसरीकडे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनीही अर्ज भरला. त्यामुळे आघाडीचेच दोन उमेदवार रिंगणात असताना त्यापैकी सभापती कोणाला करायचे, हे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर निश्चित करणार आहेत. 

 

या पार्श्वभूमीवर, आपला सभापतीपदाचा उमेदवार राष्ट्रवादीने पळवल्याने शहर भाजप संभ्रमित स्थितीत आहे. महापौर बाबासाहेब वाकळे व शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांची भूमिका आता महत्त्वाची झाली आहे. पहिल्या टप्प्यात स्थायी समिती सभापतीपद निवडणुकीच्या मतदानात भाजपने सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय या दोघांना तातडीने करावा लागणार आहे व नंतर मग भाजप पक्ष चिन्हावर निवडून आलेल्या मनोज कोतकर यांनी पक्षांतर केल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया करावी लागणार आहे. महापालिकेतील सग्यासोयऱ्यांचे राजकारण पाहता ते ती करतील की नाही, याचाही संभ्रम आहेच. पण या सगळ्या घडामोडींतून महापालिकेत गुरुवार धमाकेदार ठरला. केवळ पंचा बदलला व राजकारण फिरले, अशीच स्थिती झाली व ती चर्चेला उधाण देऊन गेली.


महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी (२५ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. स्थायीच्या १६ सदस्यांना आपल्या घरीच व स्वतंत्र खोलीत एकटेच थांबून मतदानात भाग घ्यावा लागणार आहे. समितीत शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ५, भाजपचे ४ तर काँग्रेस व बहुजन समाज पक्षाचे प्रत्येकी एक असे १६ सदस्य आहेत. या समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादीकडून मनोज कोतकर यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांना कुमारसिंह वाकळे व गणेश भोसले सूचक-अनुमोदक आहेत. तर शिवसेनेचे योगीराज गाडे यांनीही उमेदवारी दाखल केली असून, त्यांना सूचक-अनुमोदक श्याम नळकांडे व विजय पठारे आहेत. मागील जानेवारीत स्थायी समितीतून निवृत्त झालेले कोतकर त्यानंतर भाजपच्याच कोट्यातून पुन्हा स्थायी समितीवर आले व गुरुवारी अवघ्या काही मिनिटात त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. मनपातील राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांच्या दालनातच त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश सोहळा झाला. भोसले व वाकळेंसह डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे व सुमित कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर लगेच कोतकर यांनी सभापतीपदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली. त्यामुळे आता समितीत राष्ट्रवादीचे संख्याबळ ६, शिवसेनेचे ५, भाजपचे ३, काँग्रेस व बसपचे प्रत्येकी १ असे झाले आहे.

आता निकालाची उत्सुकता
स्थायी समिती सभापती निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सेना-राष्ट्रवादी या मित्रपक्षांनी स्थानिक महापालिका स्तरावरही अशी आघाडी करण्याचे निश्चित केल्याचे सांगितले जाते. तसेच राष्ट्रवादी व शिवसेना उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचे सांगण्यात आले व शुक्रवारी सकाळी अंतिम उमेदवार निश्चित करून स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी त्याला निवडून आणण्याची जबाबदारीही ठरवली गेल्याचे सांगितले जाते. यात आता स्थानिक स्तरावर अलटी-पलटी गेम झाल्याचे चित्र आहे. राज्यात जरी मित्र असले तरी स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी व सेनेत अजिबात मैत्री नाही, उलट त्यांच्यातील दुश्मनी नेहमी चर्चेतही असते. या पार्श्वभूमीवर, भाजपचे नगरसेवक कोतकर यांना स्थानिक राष्ट्रवादीने आपल्यात घेऊन उमेदवारीही दिली. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराची गोची झाली आहे. समितीत आता राष्ट्रवादीचे सर्वाधिक ६जण असल्याने व सेनेचे ५जण असल्याने उमेदवारीचा दावा राष्ट्रवादीचा झाला आहे. त्यामुळे सेना सदस्यांना नाईलाजाने महाविकास आघाडीच्या धर्माप्रमाणे राष्ट्रवादीला साथ देणे भाग पडणार आहे. अर्थात, यातही उलट होऊ शकते व सेनेच्या उमेदवाराला साथ देण्याचे आदेश स्थानिक राष्ट्रवादीला आले तर त्यांचीही अडचण होणार आहे आणि धावपळीत व तडकाफडकी केलेला कोतकरांचा पक्ष प्रवेश त्यामुळे पाण्यात जाणार आहे. पण, आता स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी व शिवसेनेपैकी कोणी-कोणाला साथ द्यायची याचा निर्णय अजित पवार व मिलिंद नार्वेकर ही राज्यस्तरीय श्रेष्ठी मंडळी घेणार आहेत. स्थानिक स्तरावरील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यातील आपल्या वरिष्ठांना साकडे घातले आहे. त्यामुळे मुंबईतून कोणाचे नाव येते, याची उत्सुकता वाढली आहे. यात आता भाजपच्या ३ सदस्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. कारण, महापालिकेत भाजपचा महापौर करण्यात राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे, शिवाय कोतकरांचा आताचा राष्ट्रवादी प्रवेशही भाजपच्या काही स्थानिक वरिष्ठांच्या संमतीनेच झाल्याचेही बोलले जाते. महाविकास आघाडीत यानिमित्ताने फूट पाडण्यात व सेना-राष्ट्रवादीला स्थानिक स्तरावर एकमेकांविरोधात उभे करण्यात यश मिळवण्यातून गोंडस खेळीचा दावा केला जात आहे. पण महापालिकेतील आतापर्यंतचे राजकारण पाहता सर्व सोयीने व आळीमिळी गुपचिळी पद्धतीने होते, त्यामुळे भाजपचे नगरसेवक निवडणुकीच्यावेळी गैरहजर राहणार की उपस्थित राहून कोणाला मतदान करणार, याची उत्सुकता वाढली आहे. कोतकरांनी बदललेला पक्षीय पंचा महापालिकेच्या राजकारणात खळबळ मात्र उडवून गेला आहे व महापालिकेला राज्यात नवा लौकिकही देऊन जाण्याच्या मार्गावर आहे.

Post a Comment

Previous Post Next Post