मनपा सभापती राजकारण : भाजप देणार कोतकरांना नोटिस; नगरसेवकपद रद्द करण्याच्या हालचाली सुरू

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेच्या स्थायी समितीचे नवे सभापती नेमके राष्ट्रवादीचे की भाजपचे याचा तिढा कायम असताना आता सभापतीपद निव़डीच्यानिमित्ताने झालेल्या राजकारणाचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी, सभापती कोतकर यांना पक्षाद्वारे नोटिस दिली जाणार असून, राष्ट्रवादीतील त्यांच्या प्रवेशाच्या चर्चेच्या अनुषंगाने त्यांना पक्षातून का काढून टाकले जाऊ नये तसेच त्यांचे भाजपचे नगरसेवकपद रद्द का केले जाऊ नये, य़ाची विचारणा या नोटिशीद्वारे त्यांना केली जाणार आहे, असे गंधे यांनी सांगितले.

सभापती कोतकर हे भाजपचेच असल्याचा दावा भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केला असला तरी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ती भूमिका मांडली असेल तर पण शहर जिल्हाध्यक्ष म्हणून व भाजप पक्ष संघटना म्हणून सभापती कोतकर यांना नोटिस काढून विचारणा केली जाणार आहे, असेही गंधे यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेही कोतकरांना नोटिस काढून विचारणा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी पक्ष सोडल्याचे जाहीर केलेले नाही, त्यामुळे ते पक्षात परत आले नाही तर त्यांचे नगरसेवकपद काढून घेतले जाणार आहे. त्यांनी स्वतःहून ते भाजपचे नसल्याचे म्हटले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. भाजपचे सभापती म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते पक्षाने त्यांचा सत्कारही केला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीकडून ते त्यांचे असल्याच्या होत असलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर कोतकरांना पक्षाद्वारे नोटिस पाठवून विचारणा केली जाणार आहे, असेही या नेत्याने आवर्जून स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post