कौन बनेगा स्थायी समिती सभापती.. राजकीय गुप्त बैठका जोरात


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेच्या स्थायी समितीचा नवा सभापती कोण होणार, याची उत्सुकता महापालिकेच्या वर्तुळात जास्त आहे. आम नगरकरांना यात अजिबातच रस नाही, असेही नाही. पण महापालिका व तेथील राजकारण नेहमी अनुभवणाऱ्या नगरकरांना कोणीही सभापती झाले तरी त्याने आधी नगरचे खड्डे बुजवावेत, एवढीच अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थायी समिती सभापतीपदासाठी कोणी साधा कोरा उमेदवारी अर्जही अजून नेलेला नाही. आता कोरा उमेदवारी अर्ज नेण्यास गुरुवारी दुपारी साडेबारापर्यंत व माहिती भरलेला उमेदवारी दाखल करण्यास लगेच तासाभरात म्हणजे दुपारी दीडपर्यंत मुदत असल्याने गुरुवारीच नवा सभापती कोण होणार, याचा फैसला होणार आहे.

एकानेच अर्ज दाखल केला तर बिनविरोध निवड निश्चित आहे, पण एकापेक्षा जास्त जणांनी अर्ज दाखल केले तर मग स्थायी समितीच्या १६ सदस्यांमध्ये फोडाफोडीला ऊत येणार आहे. सेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ५, भाजपचे ४ तसेच काँग्रेस व बहुजन समाज पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य असल्याने कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार अर्ज दाखल करतो, यावर कोणता पक्ष कोणासमवेत आहे, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत सेना, राष्ट्रवादी व भाजप असे तीन अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने काँग्रेस व बहुजन समाज पक्षाच्या प्रत्येकी एका सदस्याला लाखोंचे मोल येणार आहे. ते मोल फलदायी ठरले की नाही, हे शुक्रवारी २५ सप्टेंबरला प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीच स्पष्ट होणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीत शिवसेनेचे सुभाष लोंढे, योगीराज गाडे, सुवर्णा जाधव, श्याम नळकांडे व विजय पठारे असे पाच सदस्य आहेत. यातील नळकांडे यांना सभापतीपदात रस आहे. राष्ट्रवादीचेही गणेश भोसले, कुमारसिंह वाकळे, डॉ. सागर बोरुडे, परवीन कुरेशी व प्रकाश भागानगरे असे पाच सदस्य असून वाकळे त्यांच्याकडून इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. तर भाजपचे आशा कराळे, सोनाली चितळे, मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे असे चार सदस्य असून, यातील कोतकर यांनी सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसच्या सुप्रिया जाधव व बहुजन समाज पक्षाचे मुदस्सर शेख असे अन्य दोन सदस्य आहेत. सेनेकडून नळकांडे व भाजपकडून कोतकर यांची उमेदवारी चर्चेत आहे. या दोन्ही उमेदवारांची भिस्त राष्ट्रवादीवर आहे. 

राज्यात सेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार असल्याने स्थानिक महापालिकेतही राष्ट्रवादीने सेनेला साथ द्यावी, असे सेनेच्या समर्थकांना वाटते. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरी महापालिकेच्या स्तरावर भाजप व राष्ट्रवादीची मैत्री असल्याने तिला जागून राष्ट्रवादी भाजपलाच साथ देईल, असा विश्वास भाजप समर्थकांचा आहे. पण राजकीय खेळ्यात राष्ट्रवादीने उमेदवार देऊन या दोन्ही पक्षांकडे मैत्री निभावण्याची अपेक्षा व्यक्त केली तर मग त्रांगडे होणार आहे व घोडेबाजाराला ऊत येणार आहे. त्यामुळेच मनपा स्थायी समिती सभापती कोण होणार, याची उत्सुकता महापालिकेत जास्त व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post