सभापती कोतकर सांगा कोणाचे? राष्ट्रवादीपाठोपाठ भाजपचाही त्यांच्यावर दावा; आपण येड्यात निघाल्याची सेनेत भावना लागली वाढीस

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
'पप्पा...सांगा कोणाचे...पप्पा...माझ्या मम्मीचे', असे एक जुने मराठी गाणे प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर आता नगरमध्येही एक गाणे चर्चेत येण्याची चिन्हे आहेत. नुकतेच महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी विराजमान झालेले केडगावचे मनोज कोतकर नेमके कोणाचे, याचा सवाल नगरमध्ये चर्चा घड़वू लागला आहे. राष्ट्रवादीकडून ते सभापती झाले असले व त्यांनीही ते आता आमचेच झाल्याचा दावा करून भाजपचे आणखी नगरसेवक राष्ट्रवादीत घेण्याचे मनसुबे जाहीर केले असताना दुसरीकडे कोतकर हे भाजपचेच आहेत, असा दावा भाजपनेही केल्याने ते नेमके कोणाचे, हा सवाल उपस्थित झाला आहे. या सगळ्या सवाल-जवाबात आपण मात्र येड्यात निघाल्याची भावना शिवसेनेच्या समर्थकांमध्ये वाढू लागली आहे.

भाजपचे नगरसेवक म्हणून स्थायी समितीत सदस्य झालेल्या कोतकरांनी स्थायी समिती सभापती निवडणुकीआधी एक दिवस गळ्यातील कमळ चिन्हाचा पंचा काढला व घड्याळ चिन्हाचा पंचा परिधान केला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली, त्यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेनेचे योगीराज गाडे यांच्यावर महाविकास आघाडी धर्माचा दबाव आणून त्यांना माघार घ्यायला लावली व कोतकरांना बिनविरोध सभापती केले गेले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना-राष्ट्रवादीची मैत्री स्थानिक नगरच्या स्तरावरही प्रत्यक्षात येत असल्याचा दावा करून व त्या आनंदात जिल्हा शिवसेनेचे नवे नेते व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सभापती कोतकरांना भगवी शालही पांघरली गेली. यावेळी शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकरांसह सेनेचे नगरसेवकही उपस्थित होते. यावेळी बोलताना जगतापांनी, कोतकर हे ओरिजनल राष्ट्रवादीचे की आयात राष्ट्रवादीचे हा सवालच आता राहिला नसून आम्हाला हवे ते आम्ही घडवले व तेही उघडपणे, असा दावा करून कोतकर हे राष्ट्रवादीचेच सभापती असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यानंतर आता भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही कोतकर हे आमचेच म्हणजे भाजपचेच असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या सभापतीपदाला काही अडचणी होत्या, त्यामुळे त्या दूर करण्याची ही खेळी (त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचा पंचा घालण्याची बहुदा) आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. कोतकरांनी भाजप पक्ष सोडलेला नाही, त्यांनी तसे जाहीर केलेले नाही, असा दावा करताना मंत्री गडाख यांनी महाविकास आघाडीचे सभापती म्हणून नव्हे तर नगर शहराचे सभापती म्हणून कोतकरांचा सत्कार केल्याचा दावाही वाकळेंचा आहे. अशा स्थितीत कोतकरांचा गडाखांच्या हस्ते सत्कार होत असताना कोतकरांचा सत्कार शहराचे सभापती म्हणून असेल तर शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर वाकळे यावेळी अनुपस्थित का होते, या सवालाचेही उत्तर त्यांना आता द्यावे लागणार आहे.

शिवसेनेत अस्वस्थता..तर, भाजपची वेगळी खेळी
महापालिकेत भाजप व राष्ट्रवादीची मैत्री असल्याचे शिवसेनेला माहीत होते व ही मैत्री 'फेव्हीकॉल का अटूट जोड' असल्याचेही शहराचे राजकारण करणाऱी शिवसेना जाणून होती. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकाला राष्ट्रवादीत पाठवून व सेनेला महाविकास आघाडी धर्माची शपथ घालून माघार घ्यायला लावण्याची खेळी भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्रीनेच घडवली असल्याचे आता सेनेला जाणवू लागले आहे. आ. जगतापांपाठोपाठ महापौर वाकळेंनीही सभापती कोतकरांवर ते आमचेच असल्याचा दावा केल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना शिवसेनेत वाढू लागली आहे व ती त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठांनाही कळवली असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, कोतकर हे भाजपचेच असल्याचा दावा महापौर वाकळे यांनी केला असला तरी राष्ट्रवादीवालेही ते त्यांचे म्हणत असल्याने नेमके ते आहेत कोणाचे, याचा संभ्रम भाजपच्याही मुंबईतील वरिष्ठ नेत्यांना पडला आहे. पण त्यांनी ही इष्टापत्ती मानून राजकीय खेळी सुरू केली आहे. त्यांनी कोतकरांवर करावयाची कारवाई थांबवल्याचे समजते. 'ठंडा कर के खावो'...या भूमिकेतून कोतकरांची हकालपट्टी केली तर त्यांचे नगरसेवकपद व सभापतीपद शाबूत राहणार असल्याने ते आपलेच (भाजप) असल्याचे दावे करण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या राज्यस्तरीय मैत्रीतही संभ्रमाची स्थिती निर्माण करण्याची ही राज्यस्तरीय भाजपची खेळी असावी, असे बोलले जात आहे. मात्र, या कुरघोड्यांच्या खेळ्यात नगरच्या स्तरावर तरी राष्ट्रवादी व भाजपने आपली आतापर्यंतची उघड मैत्री यावेळी गुप्तपणे जपली व त्याचवेळी शहर शिवसेनेसह राज्य सेनेला व सेनेचे जिल्ह्याचे नेतृत्व स्वीकारलेल्या मंत्री गडाखांनाही झटका दिल्याचे बोलले जात आहे.

ते सदस्यपत्र दाखवा : गाडेंची मागणी
महापालिका स्थायी समिती सभापती निवडीत महाविकास आघाडीची फसवणूक केली आहे का?, असा सवाल या सभापतीपदाच्या निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी विचारला आहे. भाजपचे नगरसेवक कोतकर यांना राष्ट्रवादीत घेऊन व महाविकास आघाडीच्या धर्माला जागण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी गाडेंना माघार घ्यायला लावली होती. पण त्यानंतर आता कोतकर यांच्यावर भाजपनेही ते आमचेच असल्याचा दावा केल्याने गाडे यांनी संतप्त भावना सोशल मिडियातून व्यक्त केली आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या निर्णयावर झालेल्या सभापती यांनी आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत सदस्य पत्र जाहीर करावे व जनतेला या वर आश्वासन द्यावे की ते महाविकास आघाडीत आले आहे . आम्ही महाविकास आघाडी व मुख्यमंत्री मा. ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. पवार साहेब यांची फसवणूक सहन करणार नाही, असेही गाडे यांनी यात स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post