कोतकरांच्या 'उत्तर'ची आता राजकीय विश्वाला प्रतीक्षा

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेच्या स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकर यांना ते भाजपचे आहेत की राष्ट्रवादीचे, हे स्पष्ट करण्याची सूचना देणारी नोटीस भाजपने बजावली असल्याने त्यांच्या आता या 'नोटिस उत्तरा'ची उत्सुकता नगरच्या राजकीय विश्वाला आहे. सोमवारी सभापतीपदाचा पदभार घेताना पत्रकारांनी त्यांना ते कोणत्या पक्षाचे आहेत, असे विचारल्यावर त्याचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले आहे. मात्र, आता भाजपची नोटीस आल्याने ते त्याला काय उत्तर देतात व स्वतःला नेमके कोणत्या पक्षाचे सभापती म्हणून नमूद करतात, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

स्थायी समितीवर भाजपच्या कोट्यातून सदस्य झालेल्या कोतकरांनी ऐनवेळी राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून त्यांच्या कोट्यातून तसेच महाविकास आघाडीचा सभापती असल्याचे सांगून शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांना माघार घेण्यास भाग पाडले आहे. मात्र, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कोतकर भाजपचेच असल्याचा दावा केला आहे तर तिकडे शिवसेनेने महाविकास आघाडीची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी कोतकरांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. आपण भाजपचा राजीनामा दिला काय, आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होता काय, याचा खुलासा करण्याचे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. तसेच भाजपकडून आपण नगरसेवक म्हणून निवडून आला असल्याने पक्ष हिताविरुद्ध कोणताही निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आपल्याला नाही, त्यामुळे तीन दिवसात आपण भाजपचा राजीनामा दिला काय व राष्ट्रवादीचे उमेदवार होता काय, याचा खुलासा करण्याचे सांगितले आहे. सोमवारी ही नोटीस त्यांना दिली गेली असल्याने आता बुधवार-गुरुवारपर्यंत त्यांचा खुलासा अपेक्षित मानला जात आहे. दरम्यान, पत्रकारांच्या याच प्रश्नांना विकासात्मक कामावर भाष्य करून बगल देणारे नवे सभापती कोतकर आता भाजपच्या नोटिशीला काय उत्तर देतात, याची उत्सुकता नगरच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post