मनपा सभापती राजकारण : कोण खरे बोलते ते सांगा; गाडेंनी विचारला जगताप व वाकळेंना सवाल, गडाख व कोरगावकरांचे मौन

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकर हे महाविकास आघाडीचे म्हणजे राष्ट्रवादी-शिवसेना मैत्रीचे असल्याचा दावा शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केल्यानंतर भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही कोतकर हे भाजपचेच असल्याचा दावा केल्याने स्थायी समिती निवडणुकीतून माघार घेतलेले शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी, जगताप व वाकळे यांना तुमच्यापैकी नेमके खरे कोण बोलते, याचा खुलासा करण्याचे आव्हान दिले आहे. दरम्यान, गाडे यांनी, सभापती निवडीतून महाविकास आघाडीची फसवणूक झाल्याच्या केलेल्या दाव्याबाबत भाष्य करण्यास शिवसेनेचे जिल्ह्याचे नवे नेते व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी नकार देऊन मौन पत्करणे सोयीस्कर मानले. त्यामुळे शहर शिवसेनेतील अस्वस्थता वाढू लागली आहे.

स्थायी समितीच्या निवडणुकीआधी भाजपच्या कोट्यातून स्थायी समितीवर गेलेले नगरसेवक मनोज कोतकर यांनी गळ्यातील भाजपचा पंचा काढून टाकून घड्याळाचा पंचा परिधान केला व सभापतीपदाची उमेदवारी राष्ट्रवादीकडून दाखल केली. त्यानंतर ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे सांगून सेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांना माघार घेण्यास भाग पाडले गेले व त्यांची बिनविरोध निवड केली गेली. त्यानंतर भाजपच्या महापौरांनी कोतकर भाजपचेच असल्याचा दावा केल्याने गाडे यांनी, मनपा राजकारणात भाजप व राष्ट्रवादीची मैत्री कायम असून, सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीची फसवणूक झाल्याचा दावा करून सेनेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सोशल मिडियातूनही भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, नेमकं कोण खरं बोलतंय? महापौर की आमदार? या दोघांपैकी एकजण नक्कीच खोटं बोलतंय, हे मात्र नक्की... सभापती कोतकर नेमके राष्ट्रवादीचे की भाजपाचे? जनतेची फसवणूक नगरच्या स्थायी समितीसाठी झाली आहे. .. नगरकरांना महापौर व आमदार यांनीच कोण खरं व कोण खोटं बोलतंय, याचा खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री ग़डाख व संपर्क प्रमुख कोरगावकर यांनीही यावर भाष्य करण्याचे टाळल्याने सभापती निवडीवरून झालेल्या राजकारणाने सेनेतील अस्वस्थता वाढीस लागल्याचे दिसू लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post