नगरमध्ये कोरोना मृत्यूंचे गौडबंगाल; माजी नगरसेवक वारे व पवारांकडून चौकशीची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोनामुळे आतापर्य़ंत ४५६ मृत्यू झालेत..म्हणजे नगरच्या अमरधाममधील मूलतानचंद बोरा विद्युत दाहिनीत एवढ्या मृतांवर अंत्यसंस्कार झाल्याचे अधिकृत सांगितले जाते, पण प्रत्यक्षात कोरोनामुळे मृत्यूचा सरकारी आकडा सांगितला जातो तो केवळ ३००. नगरमधील कोरोना मृत्यूचे हे गौडबंगाल उघड केले ते माजी नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांनी. मध्यंतरी काही दिवस एक विद्युतदाहिनी बंद असल्याने काही कोरोना मृतांवर लाकडाचे सरण रचूनही अंत्यसंस्कार झाले आहेत, त्यांची तसेच हिंदु धर्मातील मृत व्यक्तींवर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जातात. इतर जाती-धर्मातील करोना मृत्यूंवर त्यांच्या धर्मपद्धतीनुसार अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे त्यांचा आकडा आणखी वेगळा आहे. या पार्श्वभूमीवर करोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा मोठा असताना प्रशासन कोरोना मृत्यूंची संख्या का लपवत आहे, असा सवाल वारे व पवार यांनी केला आहे. कोरोना मृत्यूंचा आकडा नेमका किती आहे, हे प्रशासनाने स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कोरोना मृतदेह शववाहिकेत एकावर एक रचण्याच्या घटनेनंतर अमरधाममध्ये कोरोना मृत्यूंवर अंत्यसंस्कारास विलंब होत असल्याचे प्रकार उघडकीस आले. यानंतर आता कोरोना मृत्यूच्या संख्येत तफावत असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराचा कॉंग्रेसचे माजी नगरसेवक वारे व पवार यांनी भांडाफोड केला आहे. प्रशासन करोना मृत्यूंची संख्या जाणूनबुजून लपवतेय का, असा संशय वारे व पवार यांनी उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. हिंदू धर्मातील कोरोना मृत्यूंवर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. पण, करोना मृत्यूच्या संख्येत तफावत असल्याचा संशय असल्याने वारे व पवार यांनी बुधवारी दुपारी अमरधाम स्मशानभूमीत जाऊन करोना मृत्यूंवरील अंत्यसंस्काराबाबत मुलतानचंद बोरा ट्रस्टकडून माहिती घेतली. त्यांनी याबाबत चौकशी केली असता, ट्रस्टकडून बुधवार दुपारपर्यंत 456 करोना मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले गेले. यासंदर्भात वारे म्हणाले की, मुलतानचंद बोरा ट्रस्टने करोना मृत व्यक्तींवरील अंत्यसंस्कारासंदर्भात आम्हाला पत्र दिले आहे. बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 456 जणांवर अंत्यसंस्कार केल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच यासंदर्भातील बिल बूक, रिपोर्ट त्यांनी दाखविले आहेत. तर दुसरीकडे करोना मृत्यूंचा बुधवारचा सरकारी आकडा 300 आहे. पण, अमरधाममध्ये 456 जणांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यामुळे मृत्यूच्या संख्येत तफावत आढळून येत आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे व कोरोनामुळे नेमके कितीजण मृत्युमुखी पडले, हे समाजासमोर प्रशासनाने सांगितले पाहिजे तसेच कोरोना मृत्यूंची संख्या कमी दाखवण्याचे काय कारण आहे, हेही स्पष्ट केले पाहिजे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post