क्रॉस कम्प्लेंट : 'त्या' गांधींकडून 'पूर्तते'ची मागणी व मारहाण; लांडगेंची पोलिसात तक्रार


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगर अर्बन बँकेत गुरुवारी दुपारी घडलेल्या मारहाण प्रकरणी आता क्रॉस कम्प्लेंट दाखल झाली आहे. आशुतोष लांडगे यांनी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्याविरुद्ध पूर्ततेची मागणी केली व त्या कारणावरून मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणीही शुक्रवारी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या तक्रारीत लांडगे यांनी मांडलेली पूर्ततेची मागणी आर्थिक आहे की अन्य काही, याचे स्पष्टीकरण नाही. त्यामुळे ही पूर्तता नेमकी कशाची, याबाबत उत्सुकता व्यक्त होत आहे. दरम्यान, लांडगे यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र देऊन राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा व वर्धमान गांधी यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध खंडणी मागितल्याचा दावा केला आहे.


नगर अर्बन बँकेच्या मुख्यालयात गुरुवारी दुपारी माजी संचालक राजेंद्र गांधी यांना मारहाण केल्याबद्दल आशुतोष लांडगे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर लांडगे यांनी शुक्रवारी या गांधींविरुद्ध तक्रार दिल्याने त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. लांडगे हे त्यांनी भरलेल्या ४ कोटीच्या चेकसंदर्भात माहिती देण्यासाठी गुरुवारी दुपारी बँकेत गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या राजेंद्र गांधी यांनी त्यांना, तूच लांडगे आहेस काय, तुझ्या टेरा सॉफ्ट कंपनीबद्दल मला सर्व माहीत आहे. तुला आधी निरोप पोहोच झाला होता. तू बँकेचे ४ कोटी रुपये भरू शकतो, परंतु आमची पूर्तता करू शकत नाही, असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली व तू जर आमची पूर्तता केली नाही तर आम्ही तुझी आरबीआय कडे तक्रार करू व तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे या तक्रारीत लांडगे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 

 

दरम्यान, लांडगे यांनी पोलिस अधीक्षकांना तक्रार अर्ज देऊन राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा व वर्धमान गांधी यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरोधात खंडणीचा आरोप केला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून सातत्याने फोन करून आरबीआयकडे दाखल झालेली तक्रार प्रकरण मिटविण्यासाठी 50 लाख रुपये देण्याची मागणी करीत आहेत. 50 लाख रुपये नाही दिले तर याचे परिणाम वाईट होतील, अशी धमकीही वेळोवेळी दिली आहे, असे यात म्हटले आहे. माझी टेरासॉफ्ट टेकनॉलॉजिज नावाने माहिती तंत्रज्ञानची रजिस्टर फर्म आहे. या फर्मद्वारे मी वेबसाईट डेव्हलपमेंटचे काम करतो. माझ्या फर्मचे व्यवसायासाठी मी नगर अर्बन बँकेतून 9 कोटी रुपयांचे कर्ज मी घेतलेले आहे. गेल्या सहा महिन्यापासून राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा व वर्धमान गांधी यांनी माझ्य़ा बँक खातेविषयी आर.बी.आय.कडे व इतर ठिकाणी तक्रार अर्ज दिले आहेत. तुम्ही आम्हाला 50 लाख रुपये दिल्यास तुमच्याविरुद्धची तक्रार मागे घेऊ, असे मला त्यांनी फोनवर व तसेच एकमहिन्याआधी त्यांच्या घरी बोलावून मागणी केली होती. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, माझे कर्ज रितसर बँकेकडे भरणा करून खाते बंद करणार आहे, असे म्हणालो असता याचे परिणाम वाईट होतील अशी मला त्यावेळी देखील राजेंद्र चोपडा यांनी धमकी दिली होती, असे या तक्रार अर्जात लांडगेंनी नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post