डॉटर-डे ला नगरच्या बाप-लेकीने केली बेळगावला रुग्ण सेवा

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
डॉटर डे म्हणजे बाप-लेकीच्या जीवनातील आनंद दिवस मानला जातो. रविवारचा (२७ सप्टेंबर) नगरच्या बाप-लेकीने आगळ्यावेगळ्या समाधानात व्यतित केला. नगरमधील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा व त्यांची कन्या पूर्वजा यांनी कर्नाटकातील बेळगावात अपघातामुळे अडचणीत सापडलेल्या नगरच्या कुटुंबाला तेथे वैद्यकीय मदत मिळवून दिली व तीही नगरमध्ये राहून व केवळ फोनद्वारे बेळगावातील आप्तस्वकिय आणि मित्रपरिवाराच्या मदतीने. विशेष म्हणजे या बाप-लेकीने हे मदत कार्य स्वतंत्रपणे राबवले व सायंकाळी एकमेकांना सांगितल्यावर त्या समाधानात एकमेकांच्या गळ्यात पडून डॉटर डेच्या दिवशी हातून घडलेल्या अनोख्या समाजकार्याचा आनंद साजरा केला. या समाज कार्याचा अनुभव बोज्जा यांनी सोशल मिडियातून व्हायरल केल्यावर या बाप-लेकीवर नेटीझन्सने कौतुकाचा वर्षाव केला.

या घटनेबाबत माहिती देताना श्रीनिवास बोज्जा यांनी सांगितले की, ''रविवारी दुपारी मी मित्र अरविंद साठे यांच्या दुकानात बसलो असताना मला मुलगी पूर्वजाचा फोन आला. पप्पा, माझ्या मैत्रिणीच्या सर्व कुटुंबियाचा अपघात झालाय, फक्त माझी मैत्रीण शुद्धीत आहे.तिचे आई-वडील-भाऊ बेशुद्ध आहेत''.... ती फार घाबरून सांगत होती, ते ऐकून मीसुद्धा स्तब्ध झालो. पुढे तिला विचारले, ''अगं अपघात कुठे झाला ?'' तर, तिने सांगितले ''बेळगावला व पप्पा काही करा, त्यांना मदत करा, माझी मैत्रीण रडत सांगत आहे, ती फार घाबरली आहे''. हे ऐकून मी तिला बोललो, ''अरे बेटा, बेळगाव हे कर्नाटकमध्ये आहे, कशी ओळख काढणार?... थांब थोडे विचार करतो, काळजी करू नको. तुझ्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर पाठव, मी पाहतो''. तिची मैत्रीण मूळची केरळची पण ती शिक्षणाला नगरला व तिचे आई-वडीलही इकडेच स्थायिक झालेले. मला मुलीने नंबर पाठवला तसा मी तिच्या मैत्रिणीला फोन केला, तिला सांगितले, ''अग मी पूर्वजाचा पप्पा बोलतोय'', माझा आवाज ऐकून ती रडतच सांगत होती, ''काका, काही करा व मला मदत करा. काहीच कळत नाही, पप्पा-मम्मी व भाऊ बेशुद्ध आहेत. आम्हाला एका हॉस्पिटलला आणले आहे.''.. या वेळी मी तिला धीर दिला, ''असे कर डॉक्टर किंवा नर्सकडे फोन दे. मी सर्व माहिती घेतो व तुला मदतीचा प्रयत्न करतो.'' तिने मग फोन सिस्टरकडे दिला. मी त्यांच्याशी बोललो. सिस्टर म्हणतं होत्या, ''अहो मुलगी फार घाबरली, तिला धीर द्या, बाकीचे सर्व बेशुद्ध आहेत. डॉक्टर उपचार करतायेत, पण या मुलीला इकडची भाषा कळत नाही. ती मल्यालम, मराठी व इंग्रजी बोलते व इकडे सर्व कन्नड आहेत. पण मला मराठी येते व मी तिला समजवले, तुम्ही पण समजवा''. हे ऐकून मलाही काही सुचेना, तरीही मी तिला धीर दिला व फोन कट केला. मला आठवण झाली की, माझा मित्र नरेश कांबळे याची सासुरवाडी त्याच भागात कुठे तरी असल्याचे. मी लगेच त्याला फोन केला अन त्याला सर्व हकीगत सांगितली. त्याने सुद्धा त्याच काळजीने ताबडतोब त्याचा बेळगाव येथील मेहुणा गणेश याला फोन करून मदत मागितली पण गणेश बंगलोरवरून येत होता, त्याला बेळगावला यायला वेळ लागणार होता. पण तो म्हणाला, ''काहीतरी करतो व तुझा (बोज्जा) नंबर मी त्याला पाठवला व त्याचा नंबर तुलाही पाठवला आहे'', असे माझा मित्र नरेशने सांगितले. हे सर्व ऐकून मला थोडा धीर आला. मी ही गोष्ट माझ्या मुलीला सांगितली व तिला तिच्या मैत्रिणीला सांगायला सांगितले. होईल काही तर मदत, असा धीरही मुलीला दिला. तितक्यात बेळगाववरून मित्राचा मेहुणा गणेशचा फोन आला. ''मला बेळगाव यायला दीड-दोन तास लागेल पण मी माझ्या बायकोला ताबडतोब पाठवतो. तुम्ही मला पेशंटचा नंबर द्या... हे ऐकून मीच संकटातून बाहेर पडल्यासारखे मला वाटले''. मी ताबडतोब मुलीच्या मैत्रिणीचा नंबर त्याला दिला व त्याला बोललो तुमचा फार आभारी आहे तर तो म्हणाला, माणूसच माणसाला कामाला येतो, तेव्हा खरंच माणसातला देव शिल्लक असल्यासारखे वाटले. त्यानंतर मित्राच्या मेहुण्याच्या बायकोने त्या मुलीला फोन करून चहा-नाश्ता घेऊन ती हॉस्पिटल पोहचली व तिने त्या मुलीला धीर दिला, ''बेटा काळजी करू नको, सर्व ठीक होईल''. अशा प्रकारे या सर्व घटनेला एक-सव्वा तास गेला. थोडे मन शांत झाले व माझ्या कामात गुंतून गेलो.

सायंकाळी घरी आलो मुलगी पूर्वजा समोर दिसली व म्हणाली, ''पप्पा थँक्यू'' मी म्हणालो, ''काय झाले बेटा'' तर ती म्हणाली, ''माझी मैत्रीण आता भीतीतून बाहेर आली, ती शांत झाली. ती आता रडत नाही, तिचे मम्मी-डॅडी व भाऊ शुद्धीत आले.'' मी तिला म्हणालो, ''बेटा, थँक्यू काय?, हे तर आपले कर्तव्य आहे''. तिचे हे सर्व बोलणे ऐकून पाण्यात बुडणारी नाव किनाऱ्यावर आल्यासारखे वाटले. त्यानंतर ती मला म्हणाली, ''पप्पा, जशी तुमची तिला मदत झाली, तशी मी सुद्धा तिला मदत केली''. मी म्हणालो.. 'ते कसे?', तर तिने सांगितले, ''पप्पा माझी पुण्याची मैत्रीण नेहमी बेळगावचे नाव घ्यायची, तिचे मामा तिकडे राहतात, याची मला आठवण झाली व मी तिला फोन करून सर्व माहिती दिली व बेळगावमध्ये अडचणीत असलेल्या मैत्रिणीचा फोन नंबर दिला. तिच्या मामानेसुद्धा त्यांना मदत केली, ते तेथे इन्शुरन्सचे काम करतात व त्यांनी डॉक्टरांबरोबर बोलून त्यांचे सर्व इन्शुरन्सचे काम करून दिले''. मी म्हटले, ''अरे वा, मदत तू पण केली,'' असे म्हणून तिचे विशेष कौतुक केले. शेवटी बाप से बेटा सवाईची जाणीवही झाली व मुलीलासुद्धा सामाजिक भावनेची जाणीव झाली हे समजून मला चांगले वाटले.

या पृथ्वी वरच देव आहे व तो माणसातच आहे, हे संत-महामुनी सांगून गेले ते खरंय, त्याची प्रचिती मला आली व मला वाटले, जर माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागले तर कोणाचीही गरजेची आवश्यकता भासणार नाही, असेही मला जाणवले/ जागतिक कन्या दिन (डॉटर डे) च्या निमित्ताने मी मुलीला व तिने मला समाजसेवेचे अनोखे गिफ्ट दिल्याचा आगळावेगळा आनंदही मिळाला. तिच्या मैत्रिणीला मदत झाली आणि माझं मलाही समाधान लाभलं, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post