जिल्हा विभाजनाचा रंगला ऑनलाइन मतदान खेळ.. श्रीरामपूर-संगमनेरमध्ये चुरस


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : नगर जिल्ह्याचे विभाजन हा नगर जिल्ह्यात प्रत्यक्ष किती गरजेचे आहे, याचा विचार न करता तो एक राजकीय विषय झाला असल्याने त्याच्या मुहूर्ताची जिल्हावासियांना वर्षानुवर्षापासून प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मिडियातून सध्या जिल्हा विभाजनाच्या ऑनलाइन (https://vote.pollcode.com/39751421) मतदानाचा खेळ रंगला आहे. यात आतापर्यंत ३४ हजारावर जणांनी मतदान केले असून, श्रीरामपूर व संगमनेर या दोन शहरांमध्ये नव्या जिल्ह्याच्या मुख्यालयाबाबत चुरस सुरू आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत श्रीरामपूरसाठी ४६ टक्के तर संगमनेरसाठी ४१ टक्के ऑनलाईन मतदान झाले होते. अर्थात जिल्हा विभाजनाचे हे ऑनलाइन मतदान कोणत्या संस्थेने व कशासाठी तसेच कुणाच्या सांगण्यावरून सुरू केले, याबाबत कोणालाही काहीच माहिती नाही. अमेरिकेतून ही मोहीम सुरू झाल्याचे सांगतात, अमेरिकेतील जिल्हावासियांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळात हा घरबसल्या उपक्रम सुरू केल्याचे सांगितले जाते. पण आता त्याने चांगली गती घेतली आहे. श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने या ऑनलाइन मतदानाची लिंक सगळीकडे व्हायरल केली असून, श्रीरामपूर नव्या जिल्ह्याची आशा बाळगणारांकडून त्यावर मतदान करवून घेतले जात आहे. या मतदानाचा शेवट कधी होणार व त्या मतदानाची दखल कोण घेणार, याचा प्रश्न असला तरी सध्याच्या स्थितीत हे ऑनलाइन मतदान श्रीरामपूर, संगमनेर, शिर्डी व कोपरगाव परिसरात चर्चेचा विषय झाले आहे.

नगर जिल्ह्याचे विभाजन हा विषय मागील २५-३० वर्षांपासून चर्चेत आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप अशा चारही प्रमुख पक्षांची सरकारे येऊन गेली असली तरी यापैकी कोणाचीही जिल्हा विभाजन करण्याची हिंमत झालेली नाही. अर्थात त्यांची जिल्हा विभाजनाला तात्विक संमती होती, पण नव्या उत्तरेतील जिल्ह्याचे मुख्यालय कोणते असावे, याचा पेच उत्तर नगर जिल्ह्यातील दिग्गज नेते राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, मधुकरराव पिचड, शंकरराव कोल्हे, अशोकराव काळे, भानुदास मुरकुटे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांनी एकमताने सोडवावा, म्हणणे आम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. पण आतापर्यंत उत्तरेतील दिग्गजांमध्ये मुख्यालयाबाबत एकमत झालेले नसल्याने जिल्हा विभाजनाचे भिजत घोंगडे कायम आहे. मागील भाजप सरकारच्या काळात जिल्हा विभाजन पुन्हा ऐरणीवर आले होते व त्यावेळी संगमनेर-श्रीरामपूरमध्ये मुख्यालयासाठी रस्सीखेच सुरू होती. दोन्हीकडून आंदोलने जोरात होती. पण तरीही भाजपची जिल्हा विभाजनाची हिंमत झाली नाही. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पुन्हा या विषयाने उचल खाल्ली आहे. त्यात आता जिल्हा विभाजनाबाबत ऑनलाइन मतदान फंडा वापरला जात असल्याने तो चर्चेत आला आहे. 

वोट पोल लिंकवर हे ऑनलाइन मतदान सध्या जोरात सुरू आहे. नगर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवा जिल्हा व्हावा, असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न विचारून संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव व शिर्डी असे चार पर्याय (ऑप्शन्स) दिले गेले आहेत. यापैकी एकावर क्लिक केल्यावर आतापर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारीही स्पष्ट होते. शुक्रवारी दुपारपर्यंत ३४ हजार ५३५जणांनी यावर मतदान केले होते व त्यापैकी १४ हजार ११८ म्हणजे ४१ टक्के मते संगमनेरला, १५ हजार ९१२ म्हणजे ४६ टक्के मते श्रीरामपूरला मिळाली होती. या दोन्ही शहरांमध्येच नव्या मुख्यालयासाठीची रस्सीखेच दिसत होती. कोपरगाव शहराला १ हजार ५४४ म्हणजे ५ टक्के तर शिर्डी शहराला २ हजार ९६१ म्हणजे ९ टक्केजणांचा पाठिंबा दिसत होता. दरम्यान, प्रत्यक्ष जिल्हा विभाजनाच्या निर्णयात या ऑनलाईन मतदानाचा विचार होईल की नाही, याबाबत शंका असली तरी सध्याच्या कोरोनाच्या काळात जिल्हा विभाजनाचे हे ऑनलाइन मतदान चर्चेला नवा विषय देऊन गेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post