एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : नगर शहरातील बहुतांश रस्ते पावसामुळे खड्डेमय झाले असल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेतील ६८ नगरसेवकांनी प्रत्येकी १ लाख रुपये द्यावेत, असे आवाहन काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी केले आहे. तसेच यानिमित्ताने मनपा प्रशासनाला टोला लगावताना, रिलायन्स फोन कंपनीकडून भूमिगत केबल टाकण्याच्या कामासाठी आलेले ६६ लाख रुपयांतून ठेकेदारांची बिले न काढता ही रक्कम व नगरसेवकांची रक्कम मिळून सुमारे सव्वा कोटीच्या निधीतून खड्डे दुरुस्ती प्राधान्याने करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
नगरमध्ये सध्या खड्ड्यांचे राजकारण पेटले आहे. महापालिकेत भाजपला सत्तेवर बसवणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीने खड्डे दुरुस्तीची मागणी केली आहे आणि काँग्रेसने तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे शहर शिवसेनेनेही आठ दिवसात खड्डे दुरुस्ती झाली नाही तर भाजपच्या महापौरांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपनेही तातडीने बैठका घेत खड्डे दुरुस्तीची कामे करण्यास ठेकेदारांना भाग पाडण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी प्रत्येक नगरसेवकाला खड्डे दुरुस्तीसाठी १ लाख रुपये देण्याचे केलेले आवाहन चर्चेत आले आहे. या आवाहनात किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
महापालिकेत ६८ नगरसेवक व स्वीकृत नगरसेवक ५ असे एकूण ७३ नगरसेवक आहेत. या सर्व ७३ नगरसेवकांना सन २०२०-२०२१ साठी ५ लाख रुपये प्रभाग विकास निधी दिला जाणार आहे. यामधून प्रत्येकी "किमान एक लाख रुपये" एवढा निधी शहर खड्डेमुक्त करण्यासाठी जर दिले तर जमा होणारी ७३ लाख व रिलायन्स कंपनीकडून मिळणारे ६६ लाख असे एकूण १ कोटी ३९ लाख जमा होऊन या रकमेतून संपूर्ण शहर खड्डेमुक्त होईल, असा दावा चव्हाण यांचा आहे. खड्ड्यांचे शहर ही ओळख पुसायची असेल तर या बाबींचा विचार करावाच लागेल, असेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनी ५ स्वीकृत नगरसेवकांकडूनही प्रत्येकी १ लाख घेण्याचे आवाहन केले असले तरी महापालिकेत अजूनही स्वीकृत नगरसेवक निवडले गेलेले नाहीत. या निवडीसाठी सत्ताधारी भाजपने घातलेला घाट जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उधळून लावला आहे. स्वीकृत होऊ इच्छिणारांपैकी कोणाचीही कायदेशीर नियमानुसार पात्रता नसल्याने त्यावेळी शिफारस केलेली नावे फेटाळली गेली होती व त्यानंतर पुन्हा या निवडीची चर्चा वा सुतोवाचही महापालिकेत झाले नाही. त्यामुळे ६८ नगरसेवकांचे ६८ लाख व रिलायन्सचे ६६ लाख अशा १ कोटी ३४ लाखातूनच महापालिकेला नियोजन करावे लागेल, असे दिसते. रिलायन्स कंपनीने महापालिकाकडे खोदाई कामासाठी ६६ लाखाची रक्कम जमा केलेली आहे. या रकमेतून शहरातील पॅचिंगचे काम व खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरू केले जावे, यासाठी आयुक्तांनी तातडीने या कामांबाबत निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करून कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, तोपर्यंत रिलायंस कंपनीचे पैसे ६६ लाखातून कुठल्याही ठेकेदाराचे बिल मनपाने अदा करू नये, असेही चव्हाण यांनी सुचवले आहे. दरम्यान, चव्हाण यांच्या पत्नी व काँग्रेसच्या नगरसेविका शीला दीप चव्हाण यांनी त्यांना मनपाकडून देय असलेल्या ५ लाखांच्या निधीतून रुपये एक लाख शहर खड्डेमुक्त करण्यासाठी वापरण्यात यावे यासाठी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे मंजुरीचे पत्र सुपूर्द केले आहे.
Post a Comment