राठोड यांच्या संघर्षाचा ठाकरे-फडणवीसांकडून गौरव; विधानसभेत वाहिली श्रद्धांजली


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : नगरचे माजी आमदार दिवंगत अनिल राठोड यांच्या संघर्षमय जीवनाचा सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुक्तकंठाने गौरव केला व त्यांना श्रद्धांजली वाहिली. 'राठोड म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वाघ होता', असे ठाकरे म्हणाले तर 'राठोड हे यारों के यार होते', असे गौरवोदगार फडणवीस यांनी काढले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सुरुवातीला राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करताना ठाकरे व फडणवीस यांनी राठोडांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

विधानसभेचे १९९० ते २०१४ असे तब्बल २५ वर्षे सदस्य राहिलेले नगरचे शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे मागच्या महिन्यात हृदयविकाराने निधन झाले. ते शिवसेनेचे उपनेतेही होते. त्यांच्या निधनाने नगर शहर व जिल्हा शिवसेनेचा आधारवड कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सुरुवातीलाच राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला व ते म्हणाले, 'माझा अजूनही विश्वास बसत नाही की अनिल राठोड यांना श्रद्धांजली वहावी लागतेय. ते कट्टर शिवसैनिक होते. ते राजस्थानातून महाराष्ट्रात आले. पण नगरमध्ये कोणतीही मोठी संस्था वा कारखाना पाठीशी नसताना केवळ पावभाजी व ज्युसची गाडी लावून त्यांनी संपर्क वाढवला व शिवसेनेचे काम केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. त्यामुळे ध्यानीमनी नसताना ज्युस गाडीवाला आमदार व मंत्री झाला. शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा व बांधिलकी असल्याने त्यांनी शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून काम केले. व्यासपीठावर एखाद्या कार्यक्रमात असले तरी त्यांचा मोबाईल वाजायचा व त्याद्वारे ते जनतेच्या कामात व्यस्त राहायचे. त्यांच्या रुपाने चळवळ्या, झुंजार व निष्ठावान कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे', अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राठोडांना श्रद्धांजली वाहिली.

विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी 'यारोंका यार' असलेले व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, अनिल राठोड हे सर्वसामान्यांचे भय्या होते. त्यांचे अचानकपणे जाणे धक्कादायक आहे. ते व मी मॅजेस्टिक आमदार निवासात एकमेकांसमोर राहायचो, ते यारोंका यार असे व्यक्तिमत्व होते. नगरमध्ये त्यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख व जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कितीही मोठा संघर्ष करण्याची त्यांची तयारी असायची. २५ वर्षे ते आमदार होते. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी गरीबांसाठी अन्नछत्र सुरू केले होते. मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असताना नगरला गेल्यावर माझ्या स्वागतासाठी शिवसैनिकांसह ते रस्त्यावर थांबले होते. माझा मित्र एवढ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष झाला, याचा आनंद त्यांनी व्यक्त केला होता. माझे व त्यांचे चांगले ऋणानुबंध होते, अशा शब्दात फडणवीस यांनी राठोडांच्या स्मृतींना उजाळा दिला.

Post a Comment

Previous Post Next Post