स्वातंत्र्यानंतरची 'ही' पहिलीच घटना असावी; माजी मंत्र्यांनी उडवली 'महाविकास'ची खिल्ली

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
राज्याचा गृहमंत्री सांगतो की, राज्यातील अधिकारी महाविकास आघाडी सरकार पाडायचा प्रयत्न करीत होते, पण हे सुरू असताना सत्ताधारी काय करीत होते?. शिवाय, अधिकारी असे एखादे सरकार पाडायला निघाल्याची ही स्वातंत्र्यानंतरची पहिलीच घटना असावी, अशा शब्दात माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारची शुक्रवारी खिल्ली उडवली. महाविकास आघाडी सरकार पाडायला निघालेल्या अधिकाऱ्यांची नावे सत्ताधारी सांगत नाहीत, व त्यांच्यावर कारवाई करीत नाही याचा अर्थ केवळ लक्ष विचलित करण्यासाठीच हे सारे सुरू आहे, असा दावा करून प्रा. शिंदे म्हणाले, सरकार मध्ये फक्त राहायचे हेच दोन्ही काँग्रेसने ठरवले आहे. याआधी आपण कोठेच नव्हतो. त्यामुळे आता फक्त सत्तेत व सरकारमध्ये राहायचे त्यांनी ठरवले आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे, दुष्काळा, ओला दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे त्यांचे लक्षच नाही. केंद्र सरकारने गरीबांसाठी दिलेले तांदूळ व गहू गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याची दानत या सरकारमध्ये नाही. हे चित्र सरकार खाली खेचल्याशिवाय बदलणार नाही. पण ते खाली खेचण्याचे प्रयत्न आम्ही करणार नाही, सत्ताधाऱ्यांच्याच कृपेने ते खाली खेचले जाईल, असा दावाही प्रा. शिंदे यांनी केला.

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ३० हजार रुपये देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना प्रा. शिंदे यांनी दिले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा ग्रामीण भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना माजी मंत्री प्रा. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, संघटन सचिव प्रसाद ढोकरीकर, सरचिटणीस दिलीप भालसिंग, उपाध्यक्ष शाम पिंपळे, तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे उपस्थित होते. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ३० हजार नुकसान भरपाई द्यावी व जिल्ह्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत तातडीने दखल घेऊन रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सोलापूर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर सह जिल्ह्यातील सर्वच भागात खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागत आहे. अपघाताचे वाढलेले असुन अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. वाहनचालक जीव मुठीत धरून या रस्त्यावरून वाहने न्यावी लागत आहेत, त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे. तसेच अतिवृष्टीमुळे बाजरी ,कापूस, उडीद,तूर ,मुग, सोयाबीन डाळिंब, संत्री , मोसंबी, केळी,ऊस सर्व फळबाग पिकाचे नुकसान झाले असून शेतकरी सध्याच्या कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीमुळे त्रस्त असून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना एकरी ३० हजाराची भरपाई द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post