राज्यात आमचे सरकार येणार व त्यांचेच नगरसेवकही आमच्यात येणार; कर्डिलेंचा दावा

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
राज्यात आता आमचे (भाजप) सरकार येणार असल्याने शहरातील राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचे नगरसेवकच आमच्यात येणार आहेत, असा दावा राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केला आहे. दरम्यान, केके रेंज भूसंपादनाबाबत येत्या बुधवारी (३० सप्टेंबर) भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीच्या राजकारणाच्या अनुषंगाने शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या (राष्ट्रवादी) संपर्कात असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी माजी आमदार कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांची बैठक शासकीय विश्रामगृहावर झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कर्डिले यांनी, आमदार जगताप यांचा दावा फेटाळला. आमचे (भाजपचे) कोणीही राष्ट्रवादीत जाणार नाहीत. उलट, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे नगरसेवकच आमच्या संपर्कात आहेत. देशात आमचे सरकार आहे व आता राज्यातही आमचेच सरकार येणार असल्याने या तिन्ही पक्षांचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आमचे कोणीही त्यांच्याबरोबर जाणार नाही, उलट, त्यांचेच नगरसेवक आमच्या बरोबर येणार आहेत, असा दावाही कर्डिलेंनी केला.

स्थायी समिती सभापती मनोज कोतकर राष्ट्रवादीत गेल्याच्या घटनेबद्दल बोलताना कर्डिले म्हणाले, आम्ही कोणालाही कोठे पाठवले नाही. पद वा स्वार्थासाठी कोणी कोठे गेले असेल, त्याबाबत शहर जिल्हाध्यक्ष योग्य तो निर्णय घेणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. केके रेंज भूसंपादनाबाबत येत्या ३० रोजी खा. डॉ. सुजय विखे व आपण भूमिका मांडणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post