सेनेच्या 'त्या' हल्ल्याचा माजी सैनिकांनी केला निषेध


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मुंबईत शिवसेनेने नाविक दलाच्या माजी सैनिकावर केलेल्या हल्ल्याचा निषेध नगर जिल्ह्यातील माजी सैनिकांनी केला आहे. आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारावर वारंवार होणारे हल्ले रोखावे व त्यांच्या कुटुंबीयांवरील अन्याय दूर करण्यासाठी हल्ले करणार्‍यांवर व कुटुंबीयांना त्रास देणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेने केली आहे. संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.

अध्यक्ष रामदास गुंड, उपाध्यक्ष सुरेंद्र खेडकर, गोपीनाथ डोंगरे, ईश्‍वर गपाट, रुबेन कमलोरी, तय्यब बेग, राजू सोनसळे, संजू ढाकणे, संजय ढाकणे, बाळासाहेब नरसाळे, संपत शिरसाट, संतोष पालवे, कृष्णा चौगुले, अण्णासाहेब भापकर, अकबर शेख आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. राज्यासह जिल्ह्यात आजी-माजी सैनिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर अन्याय होत आहे. नुकताच निवृत्त नैविक अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला झाला आहे. मनोज आवटी या सैनिकांची हत्या, रायगड जिल्ह्यातील स्वर्गीय सैनिक अतुल मांढरे यांच्या वडिलांची हत्या, ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष भारतीय सेनेत कार्यरत सैनिकांना तसेच त्यांच्या परिवारांना मारहाण, पुणे जिल्ह्यात सैनिकांच्या जमिनीवर अतिक्रमण अशा अनेक घटना पुढे येत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ज्या सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे, अशा सैनिकांना स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करण्यास अपयश येत आहे व हे पुरोगामी महाराष्ट्रात खूप दुर्दैवी आहे. त्यामुळे देशाचे संरक्षण करणार्‍या आजी-माजी सैनिकांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण केले जात आहे. आजी-माजी सैनिकांवर होणारे हल्ले व त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने आजी-माजी सैनिकांवर हल्ले करणार्‍यांवर तसेच त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आजी-माजी सैनिकांचा संयम सुटत चालला असून, नाईलाजाने सर्व आजी-माजी सैनिक तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post