नोटा छापणे बंद करून जरा माणुसकी दाखवा; पालकमंत्र्यांचा खासगी रुग्णालयांना सल्ला

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
खासगी दवाखान्यांतून कोरोना रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारी असल्याने या रुग्णालयांचे ऑडिट सुरू केले आहे. पण डॉक्टरांनी नोटा छापणे बंद करून माणुसकी दाखवण्याची गरज आहे. त्यांना परवडत नसेल तर शासनाकडे मागण्यांसाठी पाठपुरावा केला पाहिजे. काम बंद करणे वा उपचार बंद करण्यासारखे प्रकार केले तर मेस्मा कायदा लावावा लागेल, असा इशारा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिला.आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, डॉक्टरांना एमएमबीएस, बीएचएमएस, बीडीएस वा अन्य वैद्यकीय पदवी मिळण्यासाठी शासनाचाही पैसा खर्च झाला आहे. त्यामुळे त्यांनी काम बंदसारखे पाऊल उचलणे योग्य नाही. नाही तर शासनाला अत्यावश्यक सेवा कायदा-मेस्मा लागू करावा लागेल, असे सांगून ते म्हणाले, ग्रामीण भागात गाव व तालुका पातळीवर सर्व डॉक्टरांनी पुढे येऊन एकत्रितपणे कोविड सेंटर चालवले तर जिल्हा व तालुका स्तरावरील वैद्यकीय सेवेचा ताण कमी होऊ शकतो. या डॉक्टरांना गाव व तालुका पातळीवर स्थानिक स्वराज संस्थांकडून हॉल व अन्य सुविधा मिळू शकतील, असे त्यांनी सांगितले.

त्यांचे मिस मॅनेजमेंट
ऑक्सिजनची कोठेही कमतरता नाही, खासगी हॉस्पिटलला भेडसावणारी ऑक्सिजन टंचाई हा त्यांच्या मिस मॅनेजमेंटचा परिणाम आहे, असा दावा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केला. रुग्णाला ८ लिटर ऑक्सिजनची गरज असताना १२ लिटर दिले जाते तसेच सिलेंडर व पाईपमधील लिकेज दुरुस्ती करून घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी पुण्याहून टँकरची व्यवस्था येत्या एक-दोन दिवसात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रुग्णाला व्हेंटिलेटर लावायचे की नाही, याचा पूर्ण अधिकार डॉक्टरांचा आहे. कोणीही लिक्विड ऑक्सिजन सिलेंडर घरी नेण्याची रिस्क घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post