हिवरे बाजारची स्वतंत्र कोरोना नियमावली; किराणा दुकाने दोन टप्प्यात उघडणार


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोना अनलॉक-४ जाहीर होताना अत्यावश्यक सेवा २४ तास व अत्यावश्यक नसलेल्या सेवा व उद्योग-व्यवसाय १० तास सुरू ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला असला तरी नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजाराने स्वतःची स्वतंत्र कोरोना नियमावली केली आहे व त्यानुसार सकाळी ५ तास व दुपारी २ तास किराणा दुकाने उघडी ठेवली जाणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या गावपातळीवरील उपाययोजनांतर्गत हिवरे बाजार गावाने आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी म्हणून ही आपल्यापुरती नियमावली केली आहे.

सध्या खरीप कालखंडात मूग तोडणी, कांदा लागवडीसाठी शेतमजूर बाहेरून हिवरे बाजारला कामासाठी येतात. या मजुरांची राहण्याची व्यवस्था पूर्वी ठरविल्याप्रमाणे शेतातील कांदाचाळीमध्ये करण्याचे नव्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना बंधनकारक केले गेले आहे. शेतमालकाच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात हे बाहेरून येणारे मजूर येणार नाहीत याची काळजी शेतमालकाने घ्यायची आहे. गेली ६ महिने आपण सर्वांनी शिस्तीचे पालन केले आहे. गावातील आरोग्य कर्मचारी प्रत्येक कुटुंबात सर्वेक्षणासाठी येत आहेत. आपल्या घरामध्ये कोणाही व्यक्तीस ताप व सर्दी दोन दिवसांपेक्षा जास्त काळ असेल तर तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याची कल्पना द्यावी, त्यांच्यापासून कुठलाही आजार लपवून ठेवू नये, असेही ग्रामसुरक्षा समितीने स्पष्ट केले आहे.

हिवरे बाजार गावाने केलेली नियमावली
  • मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस जास्त होत असल्याने कोरोना ग्रामसुरक्षा समितीने पुढीलप्रमाणे नियमावली तयार केली आहे. सर्व ग्रामस्थांनी नियमांचे पालन करावे.
  • गावातील किराणा दुकान वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ व संध्याकाळी ३ ते ५ या वेळेव्यतिरिक्त दुकान चालू ठेवू नये व ग्रामस्थांनी दुकानात जाऊ नये. दुकानात सामाजिक अंतर ठेवावे.
  • गावातील हेअर कटिंग सलून दुकान ३० सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्णतः बंद राहील. ग्राहकांनी दुकानदाराशी संपर्क करू नये.
  • गावातील मालवाहतूकदार वाहनचालक व प्रवासी वाहने चालक यांनी स्वत:ची कोरोना तपासणी करून घ्यावी. त्यासाठी ग्रामपंचायतीशी संपर्क करावा.
  • दूध डेअरीवर सकाळी ७ ते ८ व सायंकाळी ७ ते ८ या वेळेतच दूध संकलन करावे. तसेच दूध संकलन करताना सामाजिक अंतर ठेवावे. प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.

Post a Comment

Previous Post Next Post