कोविड रुग्णांनो, काही अडचणी असतील, तर 8275199100 यावर मेसेज करा; 'जागरूक नागरिक मंचाचा उपक्रम


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोना रुग्णांना सरकारी व खासगी रुग्णालयांतूनही अनेक अडचणी येत आहेत. कोणाला बेड मिळत नाही तर कोणाला व्हेंटिलेटर, कोणाला चांगले जेवण मिळत नाही तर कोणाची खासगी रुग्णालयांकडून लुटमार होते, अशा अनेक प्रकारच्या पोस्ट राज्यभरातून सोशल मिडियावर असतात. नगरमध्येही याचे कमी-अधिक प्रमाण आहेच. मात्र, रुग्णांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काहीजण प्रयत्नही करतात. नगरमध्येही जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी हेल्पलाइन नंबर जाहीर करून गरजवंतांना आवश्यक मदतीची तयारी दाखवली आहे. राहुरीतील एका रुग्णाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यात त्यांना यश आल्यावर अशा अडचणी भेडसावणाऱ्या रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांनी हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी मुळे यांना त्यांच्या राहुरी येथील एका डॉक्टर मित्राचा फोन आला. त्या डॉक्टरांचा मित्र असलेल्या व्यक्तीला सिव्हीलमध्ये कोविड रुग्ण म्हणून दाखल केले होते, त्या रुग्णावर आवश्यक उपचार होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. त्यामुळे मुळे यांनी मित्राचा मित्र म्हणून सिव्हीलमध्ये जाऊन त्या रुग्णाचा शोध घेतला व त्याच्या अडचणी जाणून घेतल्या. त्याला द्यावयाचे महागडे इंजेक्शन सिव्हीलमध्ये उपलब्ध नसल्याने ३६ तास झाले तरी त्याला ते देण्यात आले नव्हते, तसेच ते बाहेरून आणण्य़ाबाबत त्याच्या नातेवाईकांनाही काही सांगितले गेले नव्हते. त्यामुळे मुळे यांनी संताप व्यक्त केला व सिव्हीलची यंत्रणा फैलावर घेतली. त्यानंतर अर्ध्या तासात हालचाली होऊन संबंधित इंजेक्शन सिव्हीलमध्येच उपलब्ध झाले व त्या रुग्णाला देऊन नंतर त्याला 'आयसीयू'मध्येही दाखल करून पुढील उपचार सुरू केले गेले. यानंतर मुळे यांनी सोशल मिडियावर ही घटना सविस्तरपणे मांडून गरीब रुग्णांना कोणी वाली नाही, सरकारी व खासगी रुग्णालयात नेमके काय उपचार होतात, याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना मिळत नाही. त्यामुळे अशा रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी जागरूक नागरिक मंचाची हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला.

राहुरीच्या रुग्णाला सिव्हीलमध्ये जाऊन मदत केल्यानंतर सुहासभाई मुळे यांनी जागरूक नागरिक मंचातर्फे हेल्पलाइन नंबर 8275199100 जाहीर केला व कोणाला काही अडचण असल्यास ते अथवा त्यांचा पेशंट ॲडमिट असलेल्या ठिकाणाचे नाव, स्वतःचे नाव व ज्या ठिकाणी अॅडमीट त्याचा पत्ता व फोन‌ नंबर तसेच येत असलेल्या अडचणीचे थोडक्यात स्वरूप 8275199100या नंबरवर 'एसएमएस' करण्याचे आवाहन केले आहे. जागरूक नागरिक मंचाद्वारे तातडीने त्यांच्या मदतीला जाण्याची ग्वाहीही दिली. तसेच सदर नंबरवर कृपया कुणीही फोन न करता फक्त स्वतःचे नाव, सेंटरचा पत्ता व अडचणींचे स्वरूप 'एसएमएस' केले असता खात्रीने मोफत मदत मिळेल, असेही आवर्जून स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post