जनता कर्फ्यू वा लॉकडाऊन नकोच; मनसेची भूमिका, सर्वेक्षणात नागरिकांची मते घेतल्याचा दावा


 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगरला लॉकडाऊन होणार नाही. पण जनता कर्फ्यू लावायचा असेल तर तुमचा तुम्ही निर्णय घ्या, अशी जबाबदारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर टाकली असली तरी दुसरीकडे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरला जनता कर्फ्यू वा लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका जाहीर केली आहे. नगरकरांचे मत यासाठी जाणून घेतले असून, ८० टक्के नागरिकांनी लॉकडाऊन वा जनता कर्फ्यूला विरोध केल्याचा दावा मनसेने केला आहे.


मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी यासंदर्भात भूमिका मांडताना सांगितले की, लॉकडाऊन जनतेला हवा की नको असे कोणाला वाटते याचा सर्वे मनसेच्या माध्यमातून करण्यात आला होता. त्यामध्ये जनतेच्या मनात जनता कर्फ्यु, लॉकडाऊन नको असे समोर आले. त्यामुळे मनसे जनतेसोबत आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, लॉकडाऊननंतर आता कुठेतरी गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्या लोकांचा कामधंदा व्यवस्थित सुरू असताना तसेच व्यापारी लोकांचा व्यवसाय सुरळीत होत असताना जनता कर्फ्यु करणे चुकीचे आहे. काही लोकप्रतिनिधी प्रसिध्दीसाठी जनता कर्फ्युची मागणी करीत आहेत, 10 ते15 दिवसांचा जनता कर्फ्यु करताना प्रशासनाची साथ नसेल तर जनता कर्फ्युला काय अर्थ आहे, असा सवाल करून ते म्हणाले, जनता कर्फ्यु करण्यापेक्षा प्रभागात निवडून आल्यानंतर लपून बसलेले नगरसेवक बाहेर काढून माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाप्रमाणे माझा प्रभाग-माझी जबाबदारी अभियान त्यांनी राबवावे, घरोघरी जाऊन जसे निवडणुकीत मतदारांना पैसे वाटले, तसे आज प्रशासनाची मान्यता घेऊन अँटीजन टेस्ट प्रत्येक नागरिकांची करा व ते गरजेचे आहे, असे मतही त्यांनी मांडले. 


जनतेला कोरोना मुक्तीचे सर्व शासनाचे नियम पाळण्यास जबरदस्ती करणे गरजेचे आहे. जनता कर्फ्युमुळे गोरगरीब, कामगार,व्यापारी, रिक्षाचालक,हातगाडीवर वडा-पाव, पावभाजी विकणारे तसेच अन्य जनता आर्थिक संकटात येतात, त्यामुळे मनसे या जनतेला लॉकडाऊनच्या माध्यमातून पुन्हा आर्थिक संकटात घालण्यास विरोध करणार आहे. सप्टेंबरमध्ये कर्ज हप्ता वसुलीला सर्व बँक व फायनान्स कंपन्यांकडून सुरवात झाली असून येणारे कर्जाचे हप्ते, मागचे कर्जाचे हप्ते भरण्याचे जनतेसमोर पडलेले असुन सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हजारो रुपये कर्ज हप्ते थकल्यामुळे दंडाला समोरे जावे लागत आहे. नाहक हा भुर्दंड कर्जदारांना सहन करावा लागत असतांना त्यांना अजुन आर्थिक संकटात लोटण्यापेक्षा त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी मांडले. आम्ही मनसेच्यावतीने हजारो लोकांचे लॉकडाऊनमध्ये झालेले फायनान्स कंपनीचे दंड माफ करून घेतले. त्यामुळे जनतेला काय अडचणी येत आहेत, हे आम्हाला माहीत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. 

 

आज जे लोकप्रतिनिधी जनता कर्फ्युची मागणी करीत आहे, तेच लोक खासगी हॉस्पिटलच्या वाढीव बिलांबाबत काहीही बोलत नाही. फक्त मनसेच्या माध्यमातून आम्हीच आवाज उठवत आहोत, असे सांगून ते म्हणाले, जिल्हा व तालुका सीमा बंद होणार नाहीत, वाहतूक चालूच राहणार असेल तर अशा जनता कर्फ्युचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी केला आहे. यामुळे जनतेने मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत तसेच जर कोणीही जनता कर्फ्यु पुकारला तर त्यामध्ये जनतेने सहभागी होऊ नये, असे अवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, गजेन्द्र राशीनकर, अॅड अनिता दिघे, मनोज राऊत, विनोद काकडे, गणेश शिंदे, पोपट पाथरे, अमोल बोरुडे, तुषार हिरवे, अशोक दातरांगे, दीपक दांगट, गणेश मराठे आदींनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post