के. के. रेंज भूसंपादनाचा संभ्रम कायम?

 

श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
लष्कराच्या के. के. रेंज सराव क्षेत्रासाठी विस्तार होणार नाही व संपादित शेत जमिनीचा लष्कराच्या सरावासाठी वापर करण्याबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी दिल्याचा दावा पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केला असला तरी, केके रेंजचा विस्तार होणार नाही, पण लष्करी सरावासाठी जमीन वापरणार म्हणजे नेमके काय होणार, याचा संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय, केके रेंजसाठी वाढीव भूसंपादन होणार नसल्याचा महत्त्वाचा व राजकीय फायद्याचा निर्णय भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्याद्वारे जिल्ह्यातील जनतेला न सांगता भाजपच्या संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याद्वारे जिल्ह्यातील जनतेला दिला म्हणजे नेमके काय राजकारण घडले, याचाही संभ्रम वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना, पालकमंत्री म्हणून केके रेंज भूसंपादनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे पत्रकारांनी आवाहन केल्यावर त्यांनी सावध भूमिका घेतली होती. जिल्ह्यातील जनतेचे या प्रश्नी जे मत असेल, त्याच्याशी मी (मुश्रीफ) सहमत असेल व पुढच्या आठवड्यात या विषयाबाबत बैठक घेण्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. या विषयाच्या अनुषंगाने बोलताना त्यांनी, केके रेंजसाठी भूसंपादन होणार व ही माहिती मला (मुश्रीफ) भाजपचे राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनीच दिल्याचेही आवर्जून सांगितले होते. त्यामुळे एक-दीड महिन्यांपूर्वी खा. डॉ. विखे व माजी आमदार कर्डिले जेव्हा संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांना भेटले, तेव्हा त्यांनी केके रेंजचे भूसंपादन होणार असल्याचे त्यांना सांगितले असावे व आता ज्येष्ठ नेते शरद पवार व आ. निलेश लंके यांना मात्र केके रेंजचे भूसंपादन होणार नसल्याचे सांगितले जाते, म्हणजे नेमके आता काय होणार आणि कोणाचे खरे व कोणाचे खोटे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे केके रेंज भूसंपादनाबाबत संभ्रमाची स्थिती दिसू लागली आहे.


नगरपासून १५-१६ किलोमीटर अंतरावरील नगर तालुक्यातील खारेकर्जुने गावाजवळ लष्कराचे केके रेंज सराव क्षेत्र आहे. या सराव क्षेत्रासाठी १ लाख एकर नवीन जमीन घेतली जाणार असल्याचे ३५-४० वर्षांपासून सांगितले जाते. नगर, राहुरी व पारनेर या तीन तालुक्यांतील २३ गावांतील संबंधित जमीन असून, यापैकी नेमकी कोणाची जमीन जाणार व कोणाची वाचणार, याची माहिती लष्कराव्यतिरिक्त कोणाकडेही नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या यंत्रणेद्वारे या तिन्ही तालुक्यांतील संबंधित गावांमध्ये जाऊन नेमक्या कोणाच्या जमिनी बाधित होणार, याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केल्याचेही सांगितले जाते. तसेच त्यांनी केके रेंज भूसंपादनाबाबत न्यायालयातही जाण्याचा इरादा जाहीर केला आहे. संरक्षण मंत्र्यांच्या त्यांनी घेतलेल्या भेटीच्यावेळी संरक्षण मंत्र्यांनी त्यांना संबंधित जमीन घेतलीच जाणार असल्याचे स्पष्ट केले असेल तर त्यांची न्यायालयात धाव घेण्याची तयारी म्हणजे या जमिनींची नुकसान भरपाई चांगली मिळावी, यासाठीच असावी, असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही लष्कराला केके रेंजऐवजी राज्यात अन्यत्र १ लाख एकर क्षेत्र राज्य सरकारद्वारे उपलब्ध करून देण्याचा विचार मांडला आहे. अशा सगळ्या घडामोडींचा विचार करता केके रेंज विस्तारीकरण रद्दचा मोठा निर्णय व नगर-पारनेर-राहुरी तालुक्याच्या राजकारण-समाजकारणावर परिणाम करणारा हा निर्णय भाजपच्या खासदाराला डावलून राष्ट्रवादीच्या नेत्यांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवणे, यामागचे राजकीय गणितच केके रेंजचे भूसंपादन होणार की नाही, याचा संभ्रम वाढवणारे ठरले आहे. त्यामुळेच आता यात कोण राजकारण करीत आहे, याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच आता नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांची भूमिका महत्त्वाची झाली आहे. 

 

केके रेंजचे भूसंपादन नेमके होणार की नाही तसेच होणार नसेल तर भाजपचे खासदार असताना त्यांना डावलून एवढा मोठा निर्णय भाजपच्या केंद्र सरकारने कसा जाहीर केला, याची उत्तरे त्यांना द्यावी लागणार आहेत. त्यामुळेच आता त्यांच्या भूमिकेची प्रतीक्षा आहे. दरम्यान, केके रेंजचे भूसंपादन होणार नसल्याच्या आ. निलेश लंके यांच्या घोषणेमुळे पारनेर, राहुरी व नगर तालुक्यातील संबंधित २३ गावातून समाधानाचे वातावरण पसरले असल्याचे सांगितले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post