कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.. ग्रामपंचायत रस्त्यावरून भावकीत भांडणे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
ग्रामीण भागाला भावकीतील भांडणे नवीन नसतात. बांध कोरला वा थोडे इकडेतिकडे झाले की भावकीत हाणामाऱ्या होतात व पोलिसातही गुन्हे दाखल होतात. पण ग्रामपंचायतीच्या रस्त्याच्या कारणावरून भाऊबंदांमध्ये भांडणे होण्याची घटना कर्जत तालुक्यातील डोमळवाडी येथे घडली. ग्रामपंचायतीसाठी रस्ता राहू दे, असे सांगणाऱ्या काकाला पुतण्याने शिवीगाळ करीत काठीने मारले व यापुढे जर पुन्हा रस्त्याचा विषय काढला तर जीवे मारण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

गोरख कुऱ्हाडे (ड़ोमळवाडी) यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. १२ सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता ते डोमळवाडी येथील त्यांच्या घरासमोर असताना ते पुतण्या हनुमंत कुऱ्हाडे याला म्हणाले की, तुझ्या घराचे बांधकाम चालू आहे. ग्रामपंचायतसाठी रस्ता राहू दे, असे ते म्हणाल्यावर पुतण्या त्यांना म्हणाला, मी जास्त रस्ता ठेवणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे म्हणून त्याने शिवीगाळ केली व काठीने मारले तसेच पुन्हा रस्त्याचा विषय काढला तर जीवे मारण्याची धमकी दिली, असे पोलिसात दाखल तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post