नाच रे मोरा आंब्याच्या वनात.. कोपरगावच्या नेने मळ्यात बागडताहेत मोरच मोर


एएमसी मिरर वेब टीम
कोपरगाव :
नाच रे मोरा आंब्याच्या वनात...हे मराठी गाणे सर्वपरिचित आहे. पिसारा फुलवून नाचणारा मोर मन मोहवून टाकतो, याचा अनुभव कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील नेने मळा परिसर घेत आहे. झाडांची जंगले कमी होऊन सिमेंटच्या घरांची जंगले वाढू लागल्याने वन्यप्राण्यांचा मनुष्यवस्तीत वावर वाढला आहे. बिबट्या व माकडांप्रमाणे आता मोरांचाही मनुष्यवस्तीत वावर वाढू लागला आहे. कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील उद्योजक सतीश नेने यांच्या मळ्याचा मोरांना भलताच लळा लागला आहे. येथे ते भल्या सकाळी येऊन बागडण्याचा आनंद घेत आहेत.

पूर्वी सिंचन पाण्याचे वैभव असणार्‍या पढेगाव इरिगेशन बंगल्याच्या आसपास वन्यसृष्टी होती. जांभळे, आंबा, बोर, चिंचा असा रानमेवा येथे खायला मिळत असे. आता नेने मळ्यात बागडणारे मोर पढेगाव बंगला कॉलनीत असलेल्या मोरांच्या दुसऱ्या थव्याला आनंदाने साथ देतात. या दोन गटातील मोरांच्या मैत्रीची या परिसरात सध्या चांगलीच चर्चा आहे. नेने मळ्यातील मोर ओरडल्यावर पढेगाव इरिगेशन बंगला कॉलनीतील मोरही आनंदाने ओरडून प्रतिसाद देतात. नेने यांनी या मोरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. या मोरांना मळ्यातील माणसांची भीती अजिबात वाटत नाही. ते कोणत्याही भीतीविना बिनधास्तपणे या वस्तीवर वावरत असतात. येथे टाकलेले धान्याचे दाणे टिपतात व पिण्यासाठी ठेवलेले पाणी पितात. कधीकधी सतीश नेणे यांच्या अंगाखांद्यावर मोर बागडतात. इकडून तिकडे पंख फडफडत हा मोरांचा थवा आनंदाने बाग़डत असतो.

पूर्वी संवत्सर परिसरातील काळामाथा येथे मोठ्या प्रमाणात वेड्या-गोड्या बाभळीचे वन होते. मात्र तेथे अन्य झाडे लावण्यासाठी त्यावर कुऱ्हाड चालवण्यात आली आणि येथील मोरांनी आपला मोर्चा आजूबाजूच्या वस्तीकडे व गोदावरी नदीकाठी वळवला. यातील काही मोर मृत्यूमुखी पडले. संवत्सर, दहेगाव, वारी, धोत्रा या रस्त्याने शेतमाल कोपरगाव येथे विक्रीसाठी घेऊन जात असताना त्यातून पडलेले अन्नधान्य या परिसरातील मोर रस्त्यावर येऊन टिपतात. कोपरगाव येथे शाळेसाठी जाणाऱ्या स्कूल बसमधील विद्यार्थ्यांना या मोरांचे नियमित दर्शन होते. त्यामुळे हे विद्यार्थी देखील या मोरांचे मित्र झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post