ऑक्सिजनअभावी ३०० वर कंपन्या पडल्या बंद; नगरचे औद्योगिक क्षेत्र ठप्प होण्याच्या मार्गावर


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
वेल्डींग-फॅब्रिकेशन तसेच लेदर कटिंग व तत्सम फॅब्रिकेशनची कामे करणाऱ्या ३०० वर कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या कंपन्यांना त्यांच्या फॅब्रिकेशन-वेल्डींग कामासाठी ऑक्सिजनची गरज आहे. पण कोरोना रुग्णांना प्राधान्याने ऑक्सिजन देण्याच्या प्रशासनाच्या धोरणाने इंडस्ट्रीचा ऑक्सिजन पुरवठा जवळपास बंदच झाला आहे. पुण्या-मुंबईतून लिक्विड ऑक्सिजन आणून तो सिलेंडरमध्ये भरून पुरवठा करणाऱ्या नगरमधील ७-८ सप्लायर्सकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तळ ठोकून असून, ऑक्सिजन सिलेंडर औद्योगिक वापरासाठी जाऊ दिले जात नाही. त्यामुळे हजारो-लाखो रुपयांची इंडस्ट्रीयल प्रॉडक्टस निर्मिती बंद झाली असून, कामगार मंडळी काम नसल्याने बसून आहेत. काम नसल्याने सुमारे १० हजारावर कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्योजकांच्या आमी संघटनेने औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन पुरवठा काहीअंशी तरी होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा प्राधान्याने दिला जावा, पण थोडा तरी इंडस्ट्रीला दिला तरी इंडस्ट्रीचेही काम ठप्प होणार नाही, असे म्हणणे आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी व्यक्त केले.

ऑक्सिजनचा आतापर्यंतचा वापर वैद्यकीय क्षेत्रासाठी २० टक्के व औद्योगिक क्षेत्रासाठी ८० टक्के होता. पण कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी ऑक्सिजनची गरज वाढल्याने आता वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के व औद्योगिक क्षेत्रासाठी २० टक्के पुरवठा सूत्र निश्चित केले गेले आहे. पण नगरच्या स्तरावर हे सूत्रही रद्द करून १०० टक्के वैद्यकीय क्षेत्रासाठी पुरवठा धोरण राबवले जात असल्याने औद्योगिक क्षेत्राला विविध उत्पादनांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन मिळत नाही, परिणामी कारखाने बंद पडले आहेत. औद्योगिक उत्पादनेही कमी होऊ लागली आहेत. मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यावर एप्रिल व मे महिन्यात कारखाने बंदच राहिले. त्यानंतर कारखानदारांनी मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश, बिहारमध्ये ४० ते ५० हजार रुपये खर्चून व स्वतंत्र गाड्या पाठवून मजूर कामगार आणले आहेत. जूनमध्ये मेन्टेनन्स, स्वच्छता कामे झाल्यावर जुलै-ऑगस्टमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू होऊन ती सुरळीत होत असतानाच आता सप्टेंबरमध्ये ऑक्सिजन पुरवठाच बंद झाल्याने कारखान्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. 

नगरमधील सप्लायर मंडळींना औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन देण्यास मनाई केली गेल्याने काही कारखानदारांनी बाहेरून ऑक्सिजन मागवण्याची तयारी केली, पण त्यासही आडकाठी होत आहे. तुम्ही बाहेरून ऑक्सिजन आणून आम्हालाच द्या, आमची (वैद्यकीय) रिक्वायरमेंट जास्त आहे, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

मिस मॅनेजमेंटचा दोष मध्यंतरी पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा कमी पडू दिला जाणार नसल्याचे सांगताना हॉस्पिटलच्या मिस मॅनेजमेंटवरही भाष्य केले होते. रुग्णाला देताना आवश्यकतेपेक्षा जास्त ऑक्सिजन वापरणे, ऑक्सिजन सिलेंडर व पाईपची गळती रोखण्याकडे दुर्लक्षासारखे मुद्दे त्यांनी मांडले होते. याच अनुषंगाने आता उद्योग क्षेत्रातूनही वैद्यकीय ऑक्सिजन वापराचे व्यवस्थापन सुधारण्याची गरज व्यक्त होत आहे. कोरोना रुग्णांना प्राधान्याने ऑक्सिजन दिलाच पाहिजे, त्या रुग्णाला वाचवणे ही पहिली गरज आहे, पण त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र ठप्प होऊ नये म्हणून काहीअंशी ऑक्सिजन पुरवठा औद्योगिक उत्पादनांसाठीही आवश्यक असल्याचे मतही उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. याबाबत आमी संघटनेद्वारे उद्योग मंत्रालयाकडेही पाठपुरावा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post