ना. थोरात आता नगरमध्ये लक्ष घालणार; शहर जिल्हाध्यक्ष काळेंना दिल्या बैठका घेण्याच्या सूचना

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महाविकास आघाडीचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना नगर शहरातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्रशासनाच्या विविध स्तरावर बैठका लावण्यासाठी मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करेल, असेही आवर्जून त्यांना सांगितले आहे. यामुळे नगर शहरातील महापालिकेच्या कामात ना. थोरातांनी लक्ष घालण्यास सुरुवात केल्याचे दिसू लागले आहे. महापालिकेच्या कामात लक्ष घालण्याच्यानिमित्ताने शहरातील राजकारणावरही त्याचे पडसाद उमटणार आहेत. प्रोफेसर कॉलनी चौकातील भाजी विक्रेत्यांच्याविषयावरून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मध्यंतरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर व त्यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, ना. थोरात यांनी नगर शहरातील काँग्रेस पक्षाला ताकद देण्याच्या उद्देशाने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना शहरातील विविध प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याच्या केलेल्या सूचनेला विशेष महत्त्व आले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने हाती घेतलेल्या माझं कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात शहर काँग्रेसचे १०० सदस्य कोरोनादूत म्हणून काम करणार आहेत व घरोघरी जाऊन या अभियानाची जागृती करणार आहेत. या उपक्रमाचे उदघाटन नुकतेच ना. थोरात यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना त्यांनी शहर काँग्रेसच्या उपक्रमाचे कौतुक करताना शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचेही सांगितले व त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाहीही दिली. माऊली सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमाला आ. लहू कानडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.कल्याणराव काळे, आ.सुभाषराव झांबड, नगर तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के आदी उपस्थित होते. ना. थोरात यांनी नवे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना या पदावर नियुक्ती देताना नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी आतापासूनच सुरू करण्याचीही सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर आता त्यांना नगरच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याची दिलेली सूचना व या बैठकांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्वतः सूचना देण्याची दिलेली ग्वाही नगर शहराच्या राजकारणात काँग्रेसने नव्याने दमदार पावले टाकण्यास केलेल्या प्रारंभाला ताकद देणारी मानली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post