कोरोनाचे पैसे देतो सांगून वृद्धेची ४८ हजाराची फसवणूक-पोलिसात गुन्हा दाखल


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोनाचे ७ हजार रुपये तुम्हाला मिळवून देतो असे सांगून ६५ वर्षांच्या वृद्धेचे ४८ हजाराचे दागिने लंपास करण्याची घटना १३ सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजता नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात घडली. याप्रकरणी नेवासा पोलिसात हमिदा पठाण (रा. एमआयडीसी, नगर) यांनी तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती अशी की, हमीदा पठाण या नेवासे-शेवगाव एसटीने जाताना नेवासा फाटा येथे उतरल्या. त्यावेळी बसमधून २५ ते ३० वर्षे वयाचा अनोळखी माणूस त्यांच्या पाठीमागून उतरला व त्यांना म्हणाला की, मी तुम्हाला कोरोनाचे ७ हजार रुपये मिळवून देतो. त्याचे हे बोलणे ऐकल्यावर पठाण या त्यांच्या मैत्रिणीस घेऊन नेवासा फाटा येथे आल्या. त्यावेळी त्या अनोळखी व्यक्तीने पठाण यांना, तुमचे दागिने तुमच्याजवळील पिशवीत ठेवण्याचे सांगितले. त्यांनी दागिने पिशवीत ठेवून ती मैत्रिणीकडे दिल्यावर त्या व्यक्तीने पठाण यांना, तुमच्या आधार कार्डाची झेरॉक्स घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर त्या तिकडे गेल्यावर इकडे त्या व्यक्तीने पठाण यांच्या मैत्रिणीस सांगितले की, पठाण यांना झेरॉक्ससाठी पैसे लागतात, त्यामुळे त्यांची पिशवी द्या, असे म्हणून ती पिशवी ताब्यात घेऊन पोबारा केला. या पिशवीत पठाण यांचे गळ्यातील, कानातील दागिने मिळून ४८ हजाराचा ऐवज होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्या अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post