'ती' पोस्ट भोवली आणि तलवारी झाल्या जप्त!

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
फुशारकी म्हणा वा अन्य काही कारणाने म्हणा, त्याने सोशल मिडियावर तलवारी व पिस्टलसह (पिस्तुल) फोटो शेअर केला आणि ही पोस्ट त्याला महागात पडली. पोलिसांनी अवघ्या काही तासात त्याच्या घरी धडक मारून दोन तलवारी ताब्यात घेतल्या व त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टचा गुन्हाही दाखल केला. सोशल मिडियावरील पोस्टद्वारे व्हायरल केलेले पिस्टल मात्र पोलिसांना सापडले की नाही, याचा संभ्रम आहे.

याबाबतची माहिती अशी की, नेवासे तालुक्यातील नजिक चिंचोली येथील योगेश चावरे याने तलवार व पिस्टलसह फोटो सोशल मिडियावर व्हायरल केला. तो पाहिल्यावर नेवाशाचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांनी सहकारी पोलिसांसह दोन पंचांना समवेत घेऊन त्याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी त्याने ८ हजार रुपये किमतीच्या दोन तलवारी काढून दिल्या. पोलिसांनी त्या जप्त करून चावरेविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. बेकायदेशीर व विनापरवाना हत्यारे जवळ बाळगल्याबद्दल हा गुन्हा दाखल आहे. २३ रोजी दुपारी ४च्या सुमारास त्याने सोशल मिडियावर पोस्ट टाकली व त्याच दिवशी सायंकाळी पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारून तलवारी जप्त केल्या व रात्री ११ वाजता त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या गुन्ह्यात जप्त माल दोन तलवारी नमूद केल्या आहेत, पण फोटोतील पिस्टल पोलिसांना त्याच्या घरी सापडले की नाही, याचा संभ्रम मात्र कायम आहे.

Post a Comment

Previous Post Next Post