परिचारिका शारीरिक व मानसिक तणावात; रिक्त पदे भरण्यासाठी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोना रुग्णांवरील उपचारात अखंड कार्यरत असलेल्या परिचारिका शारीरिक व मानसिक तणावात सापडल्या आहेत. परिचारिकांच्या रिक्त जागांची भरती होत नसल्याने आहे त्याच परिचारिकांना रुग्णसेवेचे काम करावे लागत आहे. यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक क्षमतेवर दुष्परिणाम होत आहेत. काहींना कोरोनाची बाधाही झाली आहे. यामुळे रिक्त जागांची तातडीने भरती करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील ३५०वर परिचारिकांनी काळ्या फिती लावून काम आंदोलन सुरू केले आहे. येत्या ७ सप्टेंबरपर्यंत त्यांचे हे आंदोलन सुरू राहणार आहे व तरीही प्रश्न सुटले नाही तर ८ सप्टेंबरला काम बंद आंदोलन व त्यानंतर कधीही बेमुदत संप आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील १२५ परिचारिकांनी काळ्या फिती लावून बुधवारपासून रुग्णसेवेचे नियमित काम करण्याचे अनोखे आंदोलन सुरू केले. सिव्हील हॉस्पिटल व जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांतील तसेच कंत्राटी परिचारिका मिळून सुमारे ४०० परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिपरिचारिका व अधिसेविकांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचे कामही कार्यरत परिचारिकांना करावे लागते, त्यामुळे त्या मानसिक व शारीरिक तणावात आहेत. काहींना कोरोनाची बाधाही झाली आहे. शिवाय कंत्राटी परिचारिकांना त्यांची पात्रता, त्यांचे कौशल्य व कोरोना रुग्णसेवेत त्या घेत असलेली जोखीम याचा विचार न करता त्यांना केवळ २० हजाराचे मानधन देऊन त्यांचा अवमान केला जात आहे.

बंधपत्रित परिचारिकांची २०१५ ते २०१९दरम्यान सेवा विशेष लेखी परीक्षा घेऊन नियमित करण्याच्या मागणीकडेही शासनाकडून दुर्लक्ष होत आहे, त्यांचे पूर्वीचे मासिक वेतन रद्द करून त्यांना २५ हजाराचे मानधन दिले जात असले तरी ते रद्द करून त्यांना पूर्वीप्रमाणे मासिक वेतन दिले जावे, अशी मागणी महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या नगर शाखेच्या अध्यक्ष माया बनकर व सचिव छाया जाधव यांनी केली आहे. ग्रामीण रुग्णालयांतून परिसेविका पदाचे पुनरुज्जीवन करावे, कोविड कक्षात ७ दिवस काम करणाऱ्या परिचारिकांना ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी दिला जावा तसेच सध्याचा ५ दिवस काम व २ दिवस रजा असे वेळापत्रक रद्द केले जावे, यासह १० विविध मागण्या बनकर व जाधव यांच्या नेतृत्वाखाली परिचारिकांनी केल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post