कोणी वंदे भारत अभियान राबवले, तर कोणी विक्रम रचले.. कोरोनायोद्ध्यांची कहाणी नगरच्या पायलने केली पुस्तकबद्ध

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
एअर इंडियाचे पायलट अजित ओझा यांनी लॉकडाऊनच्या काळात 'वंदे भारत अभियान' राबवले...तर जीवन जाधव यांनी लॉकडाऊनच्या काळात परिश्रम घेऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेतला गेलेला विक्रम रचला...मुंबई येथील फायर फायटरचे अधिकारी दीपक घोष यांनी कोव्हिडच्या काळात आग विझवून अनेकांचे प्राण वाचविले...अशा अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या प्रेरणादायी कथा नगरची युवती पायल सारडा-राठी हिने पुस्तकबद्ध केल्या आहेत. या प्रेरणादायी कथांतून कोरोनाविरुद्ध अनेकांनी दिलेला लढा सर्वसामान्य जनतेला नवी उभारी देईल, असा विश्वासही तिने व्यक्त केला.


लॉकडाऊनच्या काळात कोरोना होऊनही त्यावर संघर्ष करून आपल्या कार्याचा ठसा उमटवून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ३३ योध्यांचे अनुभव प्रकट करणाऱ्या कथा ''प्रिस्पेक्टिव्हज लॉकडाऊन २०२०'' या पुस्तकात संकलित करण्यात आल्या आहेत. आय पी एस कृष्णप्रकाश व नगरच्या कन्या सीए पायल सारडा-राठी यांच्या संकल्पनेतून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन झूम अॅपद्वारे ऑनलाइन करण्यात आले. या  प्रकाशन सोहळ्यात २००मान्यवरांनी ऑनलाईन सहभाग घेतला. या पुस्तकाला ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे व प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी शुभेच्छा दिल्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या पुस्तकाचे कौतुक केले. 


कोरोनामुळे जीवनात येणाऱ्या नवनवीन समस्यांना प्रत्येकाला तोंड द्यावे लागत आहे. अशापैकी काहींची संघर्षगाथा या पुस्तकात मांडण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात जर्मनीत अडकलेला विद्यार्थी शुभम राठी याने त्याचे संघर्षमय अनुभव सांगितले आहे.मालेगावचे आयुक्त दीपक कासार यांनी कोरोनावर मात करून लढा दिला.नाशिक येथील डॉ.संजय गांगुर्डे यांना कोरोना झाल्यावर त्यांच्या सोसायटीतील लोकांनी त्यांना स्वीकारले नाही,त्यावेळी आलेल्या समस्यांचा धाडसाने त्यांनी सामना केला.नगरचे उद्योजक जितेंद्र बिहाणी,मेजर जनरल विक्रम देव डोग्रा,प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, दिल्लीचे सीए आहुजा,स्नेहल हरणे, फिल्म निर्माता निखिल द्विवेदी अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ३३ योध्यांचे प्रेरणादायी अनुभव व्यक्त करणाऱ्या कथा या पुस्तकात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post