साहेब.. तेवढी सीना नदी बुजवता आली तर पाहा ना.. येलुलकरांची कविता सोशल मिडियावर करतेय धमाल


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगरच्या नागरी सुविधांबद्दल प्रसिद्धी माध्यमे रकानेच्या रकाने भरून मजकूर प्रसिद्ध करीत असले तरी ढिम्म समजल्या जाणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाला फारशी जाग कधी येत नाही. अशा स्थितीत कोणी उपरोधिक स्वरुपात मनपा कारभाराचे वाभाडे काढले की, ती गोष्ट समाजमनाला वेगळा आनंद देते. सध्या नगरच्या सोशल मिडिया विश्वात अशीच एक कविता धमाल उडवत आहे. 

नगरच्या रसिक ग्रुपचे अध्यक्ष व माजी नगरसेवक जयंत येलुलकर यांनी व्हॉटसअॅपच्या माध्यमातून एक कविता सर्वांना पाठवली आहे. गुरुवारी (3 सप्टेंबर) सायंकाळी अर्धा-पाऊण तास नगरला जोरदार पाऊस झाला व त्यामुळे मध्य नगर शहरातील बहुतांश रस्ते पाण्याने भरून गेले. या प्रवाहांतून मार्ग काढणे नगरकरांना जिकरीचे झाले, अनेक ठिकाणी चिखल झाले. वाहने नादुरुस्त झाली. त्यामुळे नगरकरांनी मनपाविषयी संताप व्यक्त केला. शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांनीही त्याची दखल घेऊन थोड्या पावसानेही नगरकरांचे झालेले हाल मांडले व कोरोनाच्या काळात महापालिकेचे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही केली. या पार्श्वभूमीवर येलूलकर यांनी कवितेच्या माध्यमातून महापालिका कारभाराचे काढलेले वाभाडे तसेच सीना नदीही विकून टाका असे मनपा प्रशासनाला केलेले आर्जव चर्चेत आले आहे. अनेकांनी या कवितेला लाईक केले तर काहींनी येलुलकरांना तुम्हीही महापालिकेचे नगरसेवक होता, हे विसरू नका, असा सल्लाही दिला. अर्थात दोन्ही बाजूंकडून प्रतिक्रिया उमटत असल्या तरी या कवितेने नगर व नगरच्या महापालिकेच्या कारभाराचे वास्तव नगरकरांसमोर मांडल्याचे गौरवोदगारही व्यक्त झाले.

येलुलकरांची ती कविता अशी :

सन्माननीय साहेब,
महापालिका नगररचना, महसूल, भूमी अभिलेख..

सस्नेह नमस्कार,
नगर शहरातील सगळे नैसर्गिक ओढे, नाले संगनमताने बुजवले तुम्ही, बरंच झालं..
या बदल्यात तुम्हालाही चांगले पैसे मिळाले असतीलच..
तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे..
हे सगळ करत असताना तुम्हाला कोणी काही बोललं का?

नाहीं ना.. अहो, कधीच बोलणार नाही आमचे बिच्चारे नगरकर..
किती वर्षे मान खाली घालून जगत आहोत आम्ही..
ती सवयच होऊन गेलीय आम्हाला आता...

आज वीस मिनिटांच्या पावसाने सगळ शहर कसं पाण्यात बुडाल्यासारख वाटलं..
किती छान.. शहर धुतल्याचं समाधान...
स्वच्छ झालं आमचं महानगर..
अधून मधून असं व्हायलाच हवं..
म्हणूनच फार बरं झालं ओढे बुजवून..

आमच्या दलालांनीही तुम्हाला यासाठी खूप मदतही केली..
त्यांचे आभारही कोणत्या शब्दात मानावे..

साहेब, कशी आहेत आमची इथली माणसं..
चांगली,भोळी आहेत ना..
म्हणूनच असं देवकार्य चालूच ठेवा..

एक आग्रहाची विनंती करू का साहेब..
तेवढी सीना नदीही बुजवता येते का पहा..
खूप सारे पैसे मिळतील तुम्हा सगळ्यांना..
नाहीतरी सीना आता कोरडीच आहे..
वय ही खूप झालंय आता तिचं..
हळूच गळा दाबा तिचा, क्षणात मान टाकेल ती..
मरायलाच टेकली आहे.. आम्ही तरी किती करायचं तिचं..

म्हणजे मग पाऊस झाला की 
बोटीही फिरवता येतील या गल्लीतून त्या गल्लीत..

घाबरू नका, तेवढं काम कराच साहेब..
स्वतःच्या पोराबाळांच्या हिताचं पहा..
त्यांच्या भविष्याचा विचार करा..
पुण्या, मुंबईत त्यांना आलिशान फ्लॅट घेऊन द्या 
म्हणजे मग आम्हालाही
काही पुण्याचं काम झाल्याचं समाधान मिळेल.

साहेब, करा तेव्हढं काम, बुजवा सीना नदी.. घोटा तिचा गळा..
इथे तुम्हाला कोणी विचारायलाही येणार नाही..
मग, जेलमध्ये टाकायचं तर सोडाच..
तुम्हाला माहिती आहे ना आम्ही कसे .... डू आहोत..
तर मग करता ना सुरुवात, शहराच्या नकाशाची खाडाखोड करायला..

आपला
नेहमीच मान खाली घालून उभा असलेला.. एक नगरकर.

Post a Comment

Previous Post Next Post