बंद टोल नाक्यामुळे गमवावा लागला एकाला जीव; पोलिसांनी पकडले खुन्यासह त्याच्या टोळीला


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मुदत संपल्याने म्हणा वा अन्य काही कारणाने म्हणा, पण बंद असलेल्या टोल नाक्यामुळे एका परप्रांतिय ट्रक ड्रायव्हरला हकनाक आपला जीव गमवावा लागला. बंद टोलनाक्यांचे स्ट्रक्चर अजूनही महामार्गांवर कायम आहे, तेथील लाईट व सीसीटीव्ही बंद आहेत आणि टोलनाक्यांवर वाहने थांबावीत म्हणून तेथे रस्त्यावर केलेले स्पीडब्रेकर्सही कायम आहेत. परिणामी, टोल द्यायचा नसला तरी केवळ स्पीड ब्रेकरमुळे वाहनांचे नुकसान होऊ नये म्हणून वाहनांचा वेग कमी होतो व त्याचा गैरफायदा घेत लुटारू टोळ्यांकडून वाहनचालकांची लुटालूट होते. दोन दिवसांपूर्वी म्हणजे ६ सप्टेंबरला रात्री दहा ते अकराच्या दरम्यान नगर-मनमाड महामार्गावरील शिर्डीजवळील निर्मळपिंप्रीच्या बंद टोल नाक्याजवळ दोन मालट्रक लुटण्याच्या घटना घडल्या व यात लुटारूंच्या टोळीने चाकूने केलेल्या मारहाणीत कुलदीपसिंह तुंग (वय ४८, रा. मध्यप्रदेश) या परप्रांतिय ट्रक चालकाला जीव गमावावा लागला. नगरच्या बहादूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणून ८जणांच्या टोळीला जेरबंद केले. या टोळीतील दोघेजण सराईत गुन्हेगार आहेत. या टोळीतील एकजण फरारी आहे व त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, भुपेंद्रसिंह ठाकूर व कुलदीपसिंह तुंग (दोघे रा. मध्यप्रदेश) हे ट्रकमध्ये (क्रमांक एमएच ०९-एचएच ५१९३) गहू पोती भरून इंदोरहून बंगलोरला जात असताना ६ सप्टेंबरला रात्री सव्वादहाच्या सुमारास निर्मळपिंप्री शिवारातील बंद टोल नाक्याजवळून जात असताना ६ ते ७जणांनी ट्रकला अडवले व लाकडी दांडके-तलवारी व चाकूचा धाक दाखवून ट्रक थांबवली. त्यानंतर भुपेंद्रसिंह व कुलदीपसिंह यांच्या मानेवर चाकूचे वार केले, भुपेंद्रसिंहकडून ३०० रुपये काढून घेतले. मारहाणीनंतर कुलदीपसिंहच्या जखमेतून खूप रक्तस्त्राव झाला, क्लिनर असलेल्या भुपेंद्रसिंहने तशीच गाडी पुढे नेली, पण नंतर रस्त्यात कुलदीपसिंहचे निधन झाले. ही घटना घडल्यावर अर्ध्या तासात दुसरी अशीच घटना निर्मळपिंप्रीच्या बंद टोलनाक्याजवळ घडली. खालीद शेख व आयुब शेख हेही गहू पोती भरलेला ट्रक (क्रमांक एमएच १५ इजी-५८०८) घेऊन मालेगावहून बंगलोरला जात असताना टोलनाक्याजवळ ते लघुशंकेसाठी थांबल्यावर याच लुटारू टोळीने त्यांना तलवारी, लाकडी दांडके व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील २५ हजाराची रक्कम लुटली. या दोन्ही लुटालुटीच्या घटनांबाबत लोणी पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिस नाईक रोकडेंना मिळाली माहिती व आरोपी झाले जेरबंद
निर्मळ पिंप्री शिवारातील बंद टोलनाक्याजवळ दोन ट्रक लुटून एकाचा खून करण्याची घटना घडल्याने लोणी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तीन पथके करून आरोपींचा शोध सुरू केला. लोणी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक दीपक रोकडे यांना कोल्हार परिसरातील किरण राशीनकर व त्याच्या साथीदारांनी हे गुन्हे केल्याची माहिती मिळाल्यावर सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी, हेडकॉन्स्टेबल अशोक शिंदे व अशोक औटी, पोलिस नाईक दीपक रोकडे व संभाजी कुसळकर, पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ वडणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख व अन्य सहकाऱ्यांनी सापळा रचून किरण राजू राशीनकर (वय २४, रा. भगवतीपूर, कोल्हार) याला ताब्यात घेतले व त्याने दिलेल्या माहितीनुसार मग सोहेल नशीर शेख (वय १९, रा. पिंजारगल्ली, कोल्हार), संतोष सुरेश पठारे (वय २४, रा. चर्चजवळ, कोल्हार), विशाल कचरू लोखंडे (वय १९, रा. कोल्हार हाऊसिंग सोसायटी), अक्षय राजेंद्र शिंदे (वय १९, रा. राऊतवस्ती, कोल्हार), संकेत किरण लोखंडे (वय १८, रा. भारत पेट्रोल पंपाजवळ, कोल्हार), रुपेश ज्ञानदेव चव्हाण (वय १८, रा, सुरेंद्र खर्डे यांच्या वस्तीवर, कोल्हार), आणि सागर सोमनाथ देशमाने (वय ३२, रा. अंबिकानगर, कोल्हार) या आठजणांना अटक केली. यातील सागर देशमाने याच्याविरुद्ध कोपरगाव व राहाता पोलिस ठाण्यात तर किरण राशीनकर याच्याविरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात दरोडा व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

टोलनाक्यांवर बसवणार यंत्रणा
टोल नाका बंद असल्याने तेथील दिवे व सीसीटीव्ही बंद आहेत, पण या टोल नाक्याजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे वाहनांचा वेग कमी करावा लागल्याने ट्रकचालकांना मारहाण, खून व लुटालुटीची घटना घडली आहे. त्यामुळे आता महामार्गांवरील सर्व बंद टोलनाक्यांवरील किमान सीसीटीव्ही व अन्य यंत्रणा संबंधित विभागाला सांगून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिस अधीक्षक अखिलेशकुमारसिंह यांनी सांगितले. लोणी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी २४ तासात ट्रक लूट व खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केल्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post