अहमदनगर : नगरमध्ये रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांचे राजकारण जोरात तापले आहे. भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील खड्डे दुरुस्ती केली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, शहर शिवसेनेने तुम्ही (महापौर वाकळे) नगर शहरातील खड्डे दुरुस्ती केली नाही तर आम्ही (शिवसेना) तुम्हाला काळे फासू, असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. दरम्यान, शहरातील बालिकाश्रम रस्ता, कोठी रोड व केडगाव देवी रोड वगळता अन्य सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून, त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याचे आदेश महापौर वाकळेंनी मंगळवारी महापालिकेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिले आहे.
नगर शहरात सध्या रोजच पाऊस पडत असल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. पायी चालण्यासही रस्ते शिल्लक राहिल्याची स्थिती नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही, त्यामुळे तेथे अपघात होऊ नये म्हणून परिसरातील नागरिकांनी झाडांच्या फांद्या या खड्ड्यांतून रोवल्या आहेत. अशा स्थितीत शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही मनपा अधिकाऱ्यांना खड्डे दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर महापालिकेच्या सत्तेत भाजपला बसवणाऱ्या काँग्रेसनेही आता मनपाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, महापौर वाकळेंनी दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील खड्डे दुरुस्तीचे काम करण्याचे आवाहन केले आहे व ही खड्डे दुरुस्ती झाली नाही तर अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. त्यावर शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते व अन्य पदाधिकाऱ्यांनी, नगर शहरातील एक रस्ता खड्डा मुक्त दाखवा व शहर शिवसेनेकडून एक लाख रुपये बक्षीस जाहीर केले. महामार्गावरील खड्डे दाखवणारे महापौर पालिकेत का झटकतायेत जबाबदारी, अशी टीकाही सातपुते यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील खड्डे दर्शन महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना करवून देण्यात आले. जुन्या महानपालिका परिसरातील खड्ड्याला यावेळी हार घालून फुले वाहण्यात आली.
यावेळी अभियंता सुरेश इथापे तसेच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, योगीराज गाडे, गणेश कवडे, अमोल येवले, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव उपस्थित होते. महापौरांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील लोकांना काळे फासण्याचा इशारा दिला, परंतु तुम्हाला कोणी काळे फासायचे... आधी शहरातील खड्डे बुजवा मग जिल्ह्यातील खड्डे बुजवा, असे आव्हान यावेळी देण्यात आले.
दरम्यान, महापौर वाकळे यांनी मंगळवारी महापालिकेत बैठक घेऊन खड्डे दुरुस्तीचे आदेश दिले. ते म्हणाले की, शहरामध्ये ब-याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविणेबाबत यापूर्वीच नियोजन करण्यात आले आहे. परंतु पाऊस सुरू असल्याने शहरामध्ये खड्डे पॅचिंग करण्यास अडचणी येत आहेत. याबाबत शहर अभियंता इथापे यांना ज्या रस्त्यावर मोठे खड्डे आहेत, ते पावसामध्ये कसे पॅचिंग करता येईल यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या तसेच शहरामध्ये काही रस्ते मंजूर असून ठेकेदार काम करीत नसेल तर त्यांना नोटीस देवून पाऊस थांबल्यानंतर तातडीने काम सुरू करणेबाबत कळविण्यात यावे याउपरही काम करीत नसतील तर संबंधित ठेकेदार यांचेकडून सदरचे काम काढून घेण्यात यावे, असेही आदेश त्यांनी बैठकीत दिले.
Post a Comment